प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून केंद्रसरकारने रात्री उशिरा देशातील महत्वाच्या आणि मानाच्या पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये 4 जणांना पद्मविभूषण, 14 जणांना पद्मभूषण आणि 94 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. यामध्ये परदेशी नागरिकांसह राजकारणी लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. या सर्वामध्ये एक नाव विशेष चर्चेत आहे, ते म्हणजे डी. प्रकाश राव. राव हे एक चहा विक्रेते आहेत, 1976 पासून ते चहा विकण्याचे काम करत आहेत. तर या एका चहा विक्रेत्याला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
ओडिशातील कटक येथे राहणारे डी. प्रकाश राव हे गेले 5 दशके चहा विकण्याचे काम करत आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका चहा विक्रेत्याला इतका मोठा पुरस्कार कसा काय दिला, तर याचे कारण म्हणजे प्रकाश राव हे चहा विकून मिळालेल्या पैशांतील जवळपास 80 टक्के रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करतात. याचसोबत ते एक छोटी शाळा देखील चालवतात, यामध्ये 70 विद्यार्थी शिकत आहेत.
स्वतःच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे प्रकाश राज शिकू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी इतर लहान मुलांना शिक्षण देण्याचे व्रत घेतले. शाळेनंतर ते रोज रूग्णालयात जातात तिथे ते रूग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सेवा करतात. त्यांना गरम पाणी पुरवण्याचेही ते काम करतात. त्यांच्या याच कार्यामुळे नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली होती, तसेच 'मन की बात'मध्येही त्यांचा उल्लेख केला होता. यामुळेच त्यांना आज इतक्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान यंदाच्या पुरस्कारांमध्ये 21 महिला आणि 11 परदेशी नागरिकाचाही समावेश आहे. पुरस्कारांसाठी तब्बल 50 हजार अर्ज आले होते, पैकी 112 लोकांची निवड करण्यात आली आहे.