Brajesh Thakur (Photo Credits: Twitter@iamnarendranath)

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या बिहारच्या मुझफ्फरपूर (Muzaffarpur) आश्रमशाळेत जवळजवळ 34 मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे. या आश्रमशाळेचा संचालक ब्रजेश ठाकूर (Brajesh Thakur) व त्याच्या साथीदारांनी 11 मुलींची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती सीबीआयने (CBI) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. सीबीआयने जेव्हा हा तपास सुरु केला तेव्हा त्यांना स्मशानघाटाजवळ एका ठराविक जागी खोदकाम केले असता मानवी हाडांनी भरलेले पोते आढळले, यावरून सीबीआयने या प्रकरणाचा छडा लावला.

बिहारच्या या आश्रमशाळेत मुलींवर बलात्कार होण्याच्या घटना फार कालावधीपासून चालू होत्या. टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्या अहवालानंतर हे प्रकरण उघडकीस आले व याची चौकशी सुरु झाली. यामध्ये 34 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आल्यावर, न्यायालयाने बिहार सरकारला यामध्ये जातीने लक्ष घालण्यास सांगितले. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले. आश्रमशाळेत लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या काही मुलींनी पूर्वी गायब झालेल्या 11 मुलींची नावे तपास अधिकाऱ्यांना सांगितली. (हेही वाचा: धक्कादायक: पंढरपूर येथे शिक्षकांकडून चार मूकबधिर मुलींचा लैंगिक छळ)

चौकशी दरम्यान गुड्डू पटेल नामक व्यक्तीने स्मशानघाटाजवळील ही जागा दाखवली. या जागेत खोदकाम केले असता, इथून हाडांनी भरलेले पोते मिळाले. आता ठाकूरसह 21 जणांवर आरोपपत्र दाखल केले गेले आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठा अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी   शुक्रवारी पार पडली. सोमवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी पार पडणार आहे.