Delhi And Noida Schools Receive Bomb Threats (फोटो सौजन्य - X/@PeoplesUpdate)

Delhi And Noida Schools Receive Bomb Threats: राजधानी दिल्ली-नोएडातील शाळांमध्ये पुन्हा एकदा बॉम्बची धमकी (Bomb Threats) देण्यात आली आहे. शुक्रवारी सेंट स्टीफन्स कॉलेजसह (St. Stephen's College) नोएडा आणि दिल्लीतील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या. पोलिसांनी श्वान पथकासह दोन्ही शाळांची झडती घेतली असून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. मानक कार्यपद्धतीचा भाग म्हणून, कॅम्पस रिकामे करून बंद करण्यात आले. पोलिस शाळांमध्ये कसून शोध घेत आहेत.

शाळेचा कॅम्पस करण्यात आला बंद -

शाळांनी तातडीने विद्यार्थ्यांच्या पालकांना कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला असलेला धोक्याची माहिती दिली. सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आम्ही संपूर्ण झडती घेण्यासाठी शाळेचा कॅम्पस दिवसभरासाठी बंद करत आहोत, असा संदेश शाळेने पालकांना पाठवला आहे. प्राप्त माहितीनुसार, मयूर विहार फेज 1 मधील अहलकॉन इंटरनॅशनल स्कूल आणि नोएडा येथील शिव नादर स्कूलला धमकीचे ईमेल मिळाले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजला देखील बॉम्बची धमकी मिळाली आहे. घटनास्थळी बॉम्ब निकामी पथके पाठवण्यात आली आहेत. (हेही वाचा - Mumbai School Receives Bomb Threat: मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा येथील रायन ग्लोबल स्कूलला बॉम्बस्फोटाची धमकी (Watch Video))

नववीच्या विद्यार्थ्याने पाठवला होता धमकीचा मेल -

दोन दिवसांपूर्वी नोएडा येथील एका शाळेलाही धमकीचा मेल आला होता, जो शाळेतील नववीच्या एका विद्यार्थ्याने पाठवला होता. गेल्या काही महिन्यांत, दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्ब धमक्यांचे फोन आले आहेत, परंतु हे सर्व फोन बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. दिल्ली-एनसीआरमधील शाळांना धोका निर्माण होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या सर्व धमक्यांचा तपास पोलिस करत आहेत. बऱ्याचदा या धमक्या अशा मुलांकडून दिल्या जातात ज्यांना शाळेत जायचे नसते.