मागच्या वर्षीपासून भाजप (BJP)ची अधिकृत वेबसाईट अपडेट नाही. त्यानंतर ही वेबसाईट हॅक झाली. त्यानंतर आता 15 दिवसानंतर ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. मात्र भाजपाच्या या नव्या अधिकृत वेबसाईटसाठी वापरण्यात आलेले वेब टॅम्पलेट आपल्या मालकीचे असून कोणतीही परवानगी न घेता ते वापरण्यात आल्याचा आरोप आंध्र प्रदेशमधील एका कंपनीने केला आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. कंपनीच्या या दाव्यामुळे चौकीदाराच चोर असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण होत आहे.
भाजपाने कोणतेही क्रेडिट न देता टेम्प्लेटची बॅकलिंक काढून टाकल्याचा आरोप डब्ल्यूथ्रीलेआऊट्सने (W3Layouts) केला आहे. ‘आमच्या वेबसाईटवरील टॅम्पलेट कोणीही वापरू शकतो. मात्र ते वापरल्यानंतर वेबसाईटच्या शेवटी एक बॅक लिंक असते ज्यावरुन हे टॅम्पलेट कोणी तयार केले आहे हे समजते. मात्र भाजपने ही लिंकच काढून टाकली आहे, या कामाचे पैसे नाही मात्र श्रेय देण्याचेही भाजपने टाळले आहे’ असे कंपनीचे म्हणणे आहे. (हेही वाचा: चौकीदार भरतीमध्ये महाघोटाळा; CBI ने दाखल केला गुन्हा, तपास सुरु)
कंपनीने ट्विटवरून भाजपाला ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी कोणतीही दखल घेतली असा आरोपही या स्टार्टअप कंपनीने केला आहे. याबाबत कंपनीने एक ब्लॉग पोस्ट केला आहे, ‘ब्लॉगच्या शेवटी ते म्हणतात, ‘आता भाजपाच्या आयटी सेलने वेबसाईटचे संपूर्ण कोडींग बदलले आहे. ज्या राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख नेता स्वत:ला चौकीदार म्हणवतो तो पक्ष अशाप्रकारे दुसऱ्याचे काम कोणतेही सौजन्य न देता कसे चोरु शकतो असा प्रश्न आम्हाला पडला आहे.’