प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

इंडियन फूड कॉर्पोरेशन (IFC) मध्ये चौकीदारांच्या भरतीसाठी मोठ्या घोटाळ्याचा खुलासा करण्यात आला आहे. सीबीआयने याबाबत गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या वतीने केलेल्या तक्रारीनुसार, सरकारी चौकीदारांची भरती करण्यासाठी ज्या खासगी एजन्सीना ठेकेदारी देण्यात आली होती त्यांनी अयोग्य पद्धतीने ही भरती केली. सीबीआयकडून झालेल्या चौकशीत याची पुष्टी केली गेली. तपासणीमध्ये त्याच एजन्सीने इतर अनेक सरकारी उपक्रमांमध्ये चौकीदार पदांच्या भरतीमध्ये घोटाळा केल्याचे आढळून आले आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

भारत अन्न महामंडळाच्या वतीने राजधानी दिल्ली परिसरात द्वारपाल भरतीची ठेकेदारी एका खासगी एजन्सीला 10 एप्रिल 2017 मध्ये देण्यात आली होती. या एजन्सीचे नाव एस इंटिग्रेटेड सोल्यूशन्स लिमिटेड आहे. एकूण 53 पोस्टसाठी 1.08 लाख लोकांनी अर्ज केले. यामध्ये 18 फेब्रुवारी 2018 रोजी लेखी परीक्षेसाठी केवळ 98,771 उमेदवार उपस्थित होते. ज्यात एकूण 171 उमेदवार पास झाले. त्यानंतर लेखी परीक्षा, शारीरिक तपासणी यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या 96 उमेदवारांना निवडण्यात आले. त्यापैकी 53 उमेदवार निवडण्यात आले व 43 लोकानां प्रतीक्षेत ठेवले गेले. (हेही वाचा: मुंबई पालिका ई-निविदा घोटाळा: सहाय्यक आयुक्तासह 63 जण दोषी)

नंतर, जेव्हा इंडियन फूड कॉरपोरेशनला उमेदवारांच्या निवडीमध्ये घोटाळा झाल्याचे लक्षात आले तेव्हा हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. काही लोक चुकीच्या पद्धतीने परीक्षेत पास झाले. त्यामुळे योग्य उमेदवारांना संधी मिळाली नाही, असे FCI ने म्हटले आहे. अशाच प्रकारचा घोटाळा मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे झाला असल्याचे समोर आले आहे.