(संग्रहित प्रतिमा)

त्रिपुरातील सीपीआय-एमचे मुखपत्र असलेले दैनिक डेशर कथाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचे आदेश भाजप सरकारने दिले आहेत. बंगाली भाषेत प्रसारित होणाऱ्या या दैनिकाचे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रार न्यजपेपर ऑफ इंडियाकडून रद्द करण्यात आले आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर घातलेला घाला असल्याचे सीपीएमने म्हटले आहे. तसेच, विरोधी पक्षांच्या मुखपत्रांना रजिस्ट्रार न्यजपेपर ऑफ इंडियाने लक्ष्य केल्याचेही सीपीएमने म्हटले आहे.

पुस्तक कायदा, १९६७चे कथीत उल्लंघन केल्याच्या कारणावरुन त्रिपुरामधील सीपीआय (एम) चे मुखपत्र दै. डेशर कथाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. पश्चिम त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकारी (जिल्हा मॅजिस्ट्रेट)संदीप नामदेव महात्मे यांनी म्हटले आहे की, 'पीआरबी अधिनियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दैनिक डेशर कथाविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. केलेल्या चौकशीत तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. तसेच, तक्रार प्रकरणाबाबत सुरु झालेल्या सुनावनीस हजर राहण्यासाठी दैनिक डेशर कथाच्या व्यवस्थापनाला नोटीसही पाठविण्यात आली होती'.

दरम्यान, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्याचे नाव जाहीर करायला नकार दिला. त्यानी म्हटले की, तक्रारकर्त्याने या दैनिकावर अनेक आरोप लावले होते. जे मुद्द्यांवर आधारीत होते. दैनिकात दिलेली संपादक, मुद्रक, आणि मालक, प्रकाशक याबाबत दिलेली माहिती वास्तवाशी जुळत नव्हती. दरम्यान, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचे खंडण करत, संपादक समीर पॉल यांनी म्हटले आहे की, डीएम कार्यालयाकडून आम्हाला तशी कोणतीच सूचना मिळाली नाही. पीआरबी कायदा आणि वृत्तपत्रात दिलेल्या संपादक, मालक आणि मुद्रक यांच्या निकशांनुसारच दैनिक प्रकाशित करण्यात आले आहे. दैनिकाविरोधात करण्यात आलेल्या तक्रारी मागचा हेतू मला अद्यापही समजला नाही. गरज पडल्यास आम्ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी तयार असल्याचेही पॉल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला दैनिकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचे भाजपने कौतुक केले आहे. भाजपा प्रवक्ते मृणाल कांती देव यांनी म्हटले आहे की, सीपीआय (एम) आणि त्यांचे मुखपत्र असे दोघेही लोकांचा विश्वासघात करत होते. आम्ही अंतिम निर्णयाची वाट पाहात आहोत. दरम्यान, त्रिपुराचे काँग्रेस उपाध्यक्ष तपस डे यांनी म्हटले आहे की, या प्रकरणातील सत्य उजेडात यायला हवे.