भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, सध्या अनेक रूग्णालयात बेड शिल्लक नाहीत. सध्या एका दिवसात कोरोनाची तीन लाखाहून अधिक प्रकरणे समोर येत असून 2000 हून अधिक मृत्यू होत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.जर एका दिवसात आठ लाखाहून अधिक कोरोना प्रकरण आणि 5 हजार मृत्यू झाले, तर देशात काय परिस्थिती उद्भवेल? अमेरिकन अभ्यासानुसार असा अंदाज लावला जात आहे की, कोरोना भारतात मेच्या मध्याच्या मध्यभागी असेल आणि या काळात दररोज 5000 पेक्षा जास्त मृत्यू होतील.
इंडिया टुडेच्या अहवालानुसार अमेरिकेच्या अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की, मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या भारतात दररोज 5,600 पर्यंत पोहोचू शकते. याचा अर्थ असा होतो की, एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान देशात कोरोना विषाणूमुळे सुमारे तीन लाख लोक आपला जीव गमावू शकतात. (वाचा - Coronavirus Updates in India: भारतात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासात 3,46,786 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 2,624 जणांचा बळी)
वॉशिंग्टन विद्यापीठातील आरोग्य मेट्रिक्स व मूल्यांकन (आयएचएमई) संस्थेने 'कोविड -19 अंदाज' या नावाने एक स्टडी केला. यावर्षी 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे की, लसीकरणामुळे भारतातील कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटाचा वेग कमी होऊ शकतो. आयएचएमई तज्ज्ञांनी अभ्यासामध्ये असा इशारा दिला आहे की, येत्या काही आठवड्यांमध्ये भारतात कोरोना विषाणूची अत्यंत वाईट स्थिती होणार आहे. या अभ्यासासाठी, तज्ञांनी भारतात संसर्ग आणि मृत्यूच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन केले आहे.
या अभ्यासामध्ये असा अंदाज आहे की, यावर्षी 10 मेपर्यंत भारतात कोरोनामुळे मृतांची संख्या एका दिवसात 5600 वर पोचेल. त्याचबरोबर 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट दरम्यान 3 लाख 29 हजार जणांच्या मृत्यूचा अंदाज आहे. अशाप्रकारे जुलैच्या अखेरीस देशात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 6 लाख 65 हजारांच्या पुढे जाईल. त्याचबरोबर मेच्या दुसर्या आठवड्यापर्यंत देशात एकाच दिवशी प्राप्त झालेल्या कोरोना रूग्णांची संख्या 8 लाखांहून अधिक होईल. मिशिगन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डॉ. भ्रामर मुखर्जी यांच्या नेतृत्वात कोरोना स्टडी ग्रुपने भारतातील कोरोना उद्रेकाचे विश्लेषण करण्यासाठी अंदाज बांधला आहे.
सध्या देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. देशात सलग तिसर्या दिवशी तीन लाखाहून अधिक प्रकरणे सापडली आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात भारतात 3,46,786 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 2,624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.