Bharat Bandh Today in Protest of CAA-NRC. (Photo Credits: ANI)

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरी रजिस्टरच्या (CAA And NRC) निषेधार्थ आज 'भारत बंद' (Bharat Bandh) ला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पुणे शहरात 250 हून अधिक निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईत सीएए आणि एनआरसीच्या निषेधाच्या वेळी, बहुजन क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी कांजूरमार्ग स्टेशनवरील रेल्वे ट्रॅक खंडित केला होता. 'भारत बंद'च्या पार्श्वभूमीवर आज ठिकठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तसेच संवेदनशील ठिकाणी विशेष देखरेख ठेवली जात आहे.

सीएए आणि एनआरसीविरोधात बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देशभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या या भारत बंदला इतर संघटनांकडूनही पाठिंबा मिळत आहे. या सर्व संघटना सीएए आणि एनआरसीला विरोध करीत आहेत. महाराष्ट्रातील स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, पुण्यातील सारसबागसमोर रास्ता रोको करण्यात आला होता. मुंबईमध्ये कांजूरमार्ग स्थानकावर रेल रोको आंदोलन केले गेले. धुळ्यात एसटी बसवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. पालघरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. (हेही वाचा: Bharat Bandh: मुंबई मध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कांजूर मार्ग स्थानकामध्ये 'बहुजन क्रांती मोर्चा' कडून रेल रोको)

मात्र काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलेले दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये भारत बंदला पाठिंबा देणार्‍या दोन गटात संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटातील चकमकीने भयानक रूप धारण केले ज्यामध्ये दोन लोक मरण पावले आणि एक व्यक्ती जखमी झाली आहे.