पिशवीसाठी 3 रुपये दर आकारल्याने बाटा कंपनीला ठोठावला 9 हजारांचा दंड
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

ग्राहकाकडे कागदी पिशवीसाठी 3 रुपयांची मागणी करणे फुटवेअर कंपनी 'बाटा इंडिया लिमिटेड'ला (Bata India Ltd) चांगलच महागात पडले आहे. सेवेत त्रुटी आढल्याबद्दल या ग्राहकाने केलेल्या तक्रारीमुळे कंपनीला 9 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. चंदिगड ग्राहक मंचाने हे पैसे ग्राहकाला देण्याचा आदेश दिला आहे. चंदिगढचे रहिवासी दिनेश प्रसाद रतुरी यांनी बिलामध्ये कागदी पिशवीसाठी 3 रुपये आकारल्याबद्दल, ग्राहक मंचाकडे कंपनीविरुद्ध तक्रार नोंदवली होती. 'कागदी पिशवीसाठी पैसे आकारुन त्यावर बाटाने स्वतःच्या ब्रँडची जाहिरातही केली' असे दिनेश यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

दिनेश यांनी चंदिगढच्या सेक्टर 22डी मधील बाटाच्या दुकानातून 5 फेब्रुवारीला शूज खरेदी केले होते. कागदी पिशवीसह त्यांना 402 रुपयांचे बिल आकारण्यात आले. या पिशवीद्वारे कंपनी त्यांच्या ब्रँडची जाहिरात करत होती. याबाबत दिनेश यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली, व तक्रार नोंदवली. तसेच सेवेत त्रुटी आढळल्याबद्दल तीन रुपये परत करण्याची करण्याची आणि भरपाई देण्याची मागणी केली. मात्र हे आरोप कंपनीने फेटाळून लावले. (हेही वाचा: औषधाची गॅरेंटी तरीही टक्कलावर उगवले नाहीत केस; कंपनीला १४ हजार रुपयांचा दंड)

याबाबत ग्राहक मंचाने निर्णय देताना सांगितले, पिशवीसाठी पैसे आकारणे ही सेवेत त्रुटीच आहे आणि वस्तू विकत घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला कोणतेही पैसे न आकारता पिशवी देणे ही त्या दुकानाची जबाबदारी आहे. ग्राहक मंचाने बाटा इंडियाला पिशवीचे पैसे परत देण्याचा आणि ग्राहकाला खटल्यासाठी आलेला एक हजार रुपये खर्च जमा कऱण्यास सांगितले आहे. सोबत मानसिक त्रासाबद्दल 3000 आणि राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या कायदेशीर विभागाशी संबंधित खात्यात 5 हजार रुपये डिपॉझिट करण्यास सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे 3 रुपयांच्या पिशवीसाठी कंपनीला 9 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.