अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटावा यासाठी 81 वर्षीय वृद्ध महिलेने 27 वर्ष केलेला उपवास सुटणार
urmila chaturvedi (PC - You Tube )

अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटावा यासाठी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ८१ वर्षांच्या ऊर्मिला चतुर्वेदी (Urmila Chaturvedi) या निवृत्त शिक्षिकेने मागील २७ वर्षांपासून उपवास धरला होता. चतुर्वेदी यांनी केवळ फळे आणि दूध याचं सेवन करून हे व्रत ठेवले होते. ९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबतीत निकाल दिला. या निकालामुळे त्यांनी समाधान व्यक्त करत १९९२ पासून धरलेले उपवासाचे व्रत सोडणार असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा - Kartik Purnima 2019: कार्तिक पौर्णिमेनिमित्त अयोध्येत लाखो भाविकांची गर्दी)

राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने समाधानकारक निकाल दिला. त्यामुळे राममंदिराचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालामुळे आपल्याला आनंद झाला असून, २७ वर्षांपासून अंगीकारलेले उपवासाचे व्रत सोडणार आहे. यापुढे सामान्य आहाराचे सेवन करणार असल्याचे ऊर्मिला यांनी म्हटले आहे. त्यांच्या या व्रताचे उद्यापन करण्यासाठी लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येणार आहे, अशी महिती त्यांचे पुत्र अमित यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. ऊर्मिला लवकरच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना धन्यवाद देणारे पत्र पाठवणार आहेत.

दरम्यान, ऊर्मिला यांचे पुत्र अमित यांनी सांगितले की, 'माझी आई गेल्या २७ वर्षांपासून फळे आणि दूध घेऊन जीवन जगत आहेत. आईनने वयाच्या ५४ व्या वर्षी हा उपवास केला. माझी आई रामभक्त आहे. आई अयोध्येत मंदिर व्हावे यासाठी गेली २७ वर्ष उपवास करत आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिलेला निकाल ऐकून आई समाधानी झाली असून ती या व्रताचे उद्यापन करणार आहे.'