Tirupati Laddu Row: मथुरा मंदिराने मिठाईऐवजी फळे आणि फुले घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयागराजच्या तीन मोठ्या मंदिरांमध्ये प्रसादाचे नियम बदलले गेले आहेत. अयोध्या रामजन्मभूमी मंदिराचे(Ayodhya Ram Mandir) मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी बाहेरील एजन्सींनी तयार केलेल्या प्रसादावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली. मंदिराच्या प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या शुद्धतेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. (हेही वाचा: Tirupati Laddu Row: ‘धर्म पुनर्स्थापित करण्याची वेळ आली’, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केली 11 दिवसांच्या तपश्चर्येची घोषणा)
त्याशिवाय, मंदिरातील पुजाऱ्यांच्या देखरेखीखाली सर्व प्रसाद तयार करावा, असे आवाहन केले. सत्येंद्र दास यांनी देशभरात विकल्या जाणाऱ्या तेल आणि तुपाच्या गुणवत्तेची कसून तपासणी करण्याची गरज असल्याचे म्हटले. ते म्हणाले, तिरुपती बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल आढळल्याच्या घटनेवरून देशभरात वाद वाढत आहे. प्रसादात अयोग्य पदार्थ मिसळून मंदिरे विद्रुप करण्याचा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोप त्यांनी केला.
मथुरेत मिठाईऐवजी फळे आणि फुले
मथुरा येथील धर्म रक्षा संघाने 'प्रसादम' पदार्थांच्या प्राचीन शैलीकडे परतण्याचा निर्णय जाहीर केला. ते म्हणजे मिठाईऐवजी फळे, फुले आणि इतर नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या प्रसादाचा समावेश असेल असे त्यांनी म्हटले. धर्म रक्षा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सौरभ गौर यांनी प्रसाद व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणांच्या गरजेवर भर दिला. त्यांनी म्हटले की, शुद्ध, सात्विक प्रसाद अर्पण करण्याच्या आणि स्वीकारण्याच्या पारंपारिक पद्धतींकडे परत येण्यावर धार्मिक नेते आणि संघटनांमध्ये एकमत झाले आहे.
प्रयागराजमध्ये मंदिर प्रसादात काय बदल?
प्रयागराजमधील आलोप शंकरी देवी, बडे हनुमान आणि मनकामेश्वरसह अनेक मंदिरांनी भक्तांना प्रसाद म्हणून बाहेरून तयार केलेली मिठाई आणि इतर वस्तू आणण्यास बंदी घातली आहे. ललिता देवी मंदिरात सुका मेवा आणि फळे अर्पण करण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना फक्त नारळ, फळे आणि सुका मेवा आणण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. माणकामेश्वर मंदिराचे महंत श्रीधरनंद ब्रह्मचारी जी महाराज म्हणाले की, जोपर्यंत मिठाईची शुद्धता तपासात स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्यांना मंदिरात अर्पण करू दिले जाणार नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या आठवड्यात दावा केला होता की, मागील सरकारच्या काळात (YSRCP) तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीपासून तयार केलेले तूप वापरले जात होते. मात्र, नायडू यांनी राजकीय फायद्यासाठी बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा वायएसआरसीपीने केला आहे. दाव्यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.