Blast In Mohali: मोहालीत पंजाब पोलिसाच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयावर हल्ला, संपूर्ण परिसर सील
Photo Credit - Twitter

मोहालीतील पंजाब पोलिसांच्या (Punjab POlice) इंटेलिजन्स युनिटच्या (Intelligence Unit) मुख्यालयावर हल्ला (Attack) करण्यात आला आहे. इंटेलिजन्स युनिटच्या दुसऱ्या मजल्यावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समोरील बाजूने हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे कार्यालयाच्या काचा फुटल्या. मोहालीचे एसपी रविंदर पाल सिंह (Ravindra Paul Singh) यांनी सांगितले की, किरकोळ स्फोट झाला. हा हल्ला इमारतीच्या बाहेरून झाला. त्यावर रॉकेटसदृश वस्तूने हल्ला करण्यात आला आहे. यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही. आमचे वरिष्ठ अधिकारी आणि एफएसएल टीम त्याची चौकशी करत आहे.  पोलिसांनी आतापर्यंत या हल्ल्यामागे दहशतवादी कोन असण्याची शक्यता नाकारली आहे. तथापि, याला दहशतवादी हल्ला म्हणून मानले जाऊ शकते का असे विचारले असता, मोहालीचे एसपी (मुख्यालय) रविंदर पाल सिंह म्हणाले की याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. आम्ही त्याची चौकशी करत आहोत.

याआधी मोहाली पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मोहालीच्या सेक्टर 77 मधील एसएएस नगर येथील पंजाब पोलिस इंटेलिजेंस हेड क्वार्टरमध्ये सोमवारी संध्याकाळी 7:45 वाजता एक किरकोळ स्फोट झाला. नुकसानीची नोंद नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी असून तपास सुरू आहे. फॉरेन्सिक पथकांना पाचारण करण्यात आले आहे.

Tweet

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण 

पंजाब इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयावर रॉकेट लाँचरने हल्ला झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र या हल्ल्याने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मुख्यालयाबाहेर काही स्फोटक साहित्य फेकण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त गुप्तचर यंत्रणांनी मुख्यालयाला घेराव घालून तपास सुरू केला आहे. (हे देखील वाचा: 'कठीण काळात आम्ही सर्वोत्तम निर्णय घेतला'; अपंग मुलाला विमानात चढू न दिल्याबाबत इंडिगोने जारी केले निवेदन)

मुख्यमंत्र्यांनी मागवला घटनेचा अहवाल

सध्या हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मीडियालाही कार्यालयापासून दूर ठेवण्यात आले आहे. प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीच्या आजूबाजूला निवासी क्षेत्र नाही. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट संध्याकाळी 7.30 च्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मोहालीचे एसएसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या घटनेचा अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांनी डीजीपींकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात.