Journalist Deepak Chaurasia (PC - IANS)

देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (CAA) विरोधात गेल्या एक महिन्यापासून आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या एका वृत्त वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार दीपक चौरासिया (Journalist Deepak Chaurasia) आणि त्यांच्या कॅमेरामनला (Cameraman) काही जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचा कॅमेराही फोडला.

सध्या कॅमेरामनची स्थिती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक चौरासिया यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देत व्हिडिओ शेअर केला आहे. देशातील लोकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेलो. परंतु, आम्हीच मॉब लिचिंगचे बळी ठरलो, असं कॅप्शनही दीपक चौरासिया यांनी या पोस्ट दिलं आहे. (हेही वाचा - निर्भया बलात्कार प्रकरण: तिहार जेलमध्ये आरोपी विनय शर्मावर विषप्रयोग झाला; दोषी वकिल एपी सिंह यांचा आरोप)

दरम्यान, दीपक चौरासिया यांनी याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. आरोपींची ओळख पटल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं दक्षिण पूर्व दिल्लीचे उपायुक्त चिन्मय बिश्वाल यांनी सांगितलं आहे. दीपक चौरासिया आपल्या कॅमेरामनबरोबर शाहीन बाग येथील आंदोलनस्थळी गेले होते. शुटिंगला सुरुवात झाल्यानंतर तेथील लोकांनी पत्रकार आणि कॅमेरामनवर हल्ला केला. त्यांनी कॅमेरा तोडून दीपक चौरासिया आणि कॅमेरामनला मारहाण केली. सध्या पोलिसाकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.