मी भारतातचं राहणार, मात्र कोणताही पुरावा दाखवणार नाही - असदुद्दीन ओवैसी
Asaduddin Owaisi (PC - ANI)

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्द्यावरून एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मी या भारतातचं राहणार आहे. पण कोणताही पुरावा दाखवणार नाही. जर पुरावा मागितला तर आम्ही आमची छाती पुढे करू गोळ्या घालण्यास सांगू आणि म्हणू मारा छातीवर गोळ्या. कारण आमच्या ह्रदयात भारतमातेबद्दल प्रचंड प्रेम आहे,' असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोध दिल्लीतील शाहीन बाग तसेच मुंबईतील नागपाडा येथे मुस्लिम महिलांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. ओवेसी यांनी सीएए आणि एनआरसीवरून अनेकदा मोदी-शाह यांच्यावर टीका केली आहे. जो मोदी-शाह यांच्याविरोधात आवाज उठवेल तो खऱ्या अर्थाने 'मर्द-ए-मुजाहिद' ठरेल, असंही ओवैसी यानी म्हटलं आहे.

ओवेसी यांनी यापूर्वी लोकसभेत बोलताना सुधारित नागरिकत्व कायदा हा केवळ नागरिकत्व देणारा कायदा नाही, तर नागरिकत्व काढून घेणारा कायदा असल्याचा आरोप केला होता. तसेच मी घुसखोर नाही तर घुसखोरांचा बाप आहे, अशा स्वरुपाचे वक्तव्यही असदुद्दिन ओवैसी यांनी याअगोदर केले होते.