Arvind Kejriwal

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज घोषणा केली की त्यांचा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील सर्व 230 जागा लढवेल. भोपाळमध्ये (Bhopal) आप कार्यकर्त्यांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना केजरीवाल यांनी ही घोषणा केली. सध्या पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्यासोबत केजरीवाल मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.या वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका या होणार आहेत.

मध्य प्रदेशातील विविध भागातील पक्ष कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या मेळाव्याला संबोधित करताना, विशेषत: आदिवासी भागातील, केजरीवाल यांनी त्यांच्या 'दिल्ली मॉडेल'च्या मोफत सुविधांचा उल्लेख करत ते कसे मध्य प्रदेशात लागू करणार हे समजवण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशातील लोकांनाही आप चांगले सरकार देईल. मुलांसाठी चांगल्या शाळा, आरोग्याच्या पायाभूत सुविधा दिल्लीच्या मॉडेलवर विकसित केल्या जातील आणि आम आदमी पक्ष सत्तेत असेल तर स्वस्त वीजही मिळेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

केजरीवाल म्हणाले की, "मध्य प्रदेशातील लोकांना 'मामा' (मुख्यमंत्री शिवराज सिंह) चा निरोप घ्यायचा आहे आणि त्यांनी 2018 मध्ये तसे केले, परंतु काँग्रेसचे आमदार विकले गेले आणि भाजप पुन्हा सत्तेवर आले. याचा अर्थ, तुम्ही काँग्रेसला मत दिले तरी भाजप सरकार स्थापन करेल. मध्य प्रदेशची ही भ्रष्ट राजकीय व्यवस्था तुम्हीच बदलू शकता. असे आवाहन देखील केजरीवाल यांनी यावेळी केले.

दोन महिन्यांपूर्वी केजरीवाल यांनी मध्य प्रदेशची संपूर्ण टीम विसर्जित करून नव्या नियुक्त्या केल्या होत्या. मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना मोठा धक्का देण्याचा दावा करत 'आप'ने येथील जनतेला बदल हवा असल्याचे म्हटले आहे.