अरुण जेटलींशी भेट झाल्यावरच मल्या देशाबाहेर पळाला: राहुल गांधी
(Photo Credit-ANI Twitter)

'मी मल्ल्याला भेटलोच नाही', हा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा साफ खोटा आहे. भारतातून पळून जाण्यापूर्वी दोन दिवस आगोदर मल्या आणि अरुण जेटली यांच्या भेट झाली होती. ही भेट संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. तसेच, सुमारे 20 ते 25 मिनिटांपर्यंत या भेटीत चर्चा झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जेटली,मल्या यांच्यात भेट

मल्या आणि जेटली यांच्यात भेट झाली तेव्हा काँग्रेस नेते पुनिया हे देखील तेथे उपस्थित होते असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानाची काँग्रेस नेते पुनिया यांनीही पुष्टी करत जेटली आणि मल्या यांच्यात आपल्या समोरच भेट झाल्याचे म्हटले. 1 मार्च 2016 या दिवशी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका कोपऱ्यात जेटली आणि मल्या यांच्यात भेट झाली. आपण जर खोटे बोलत असू, तर राजकारण सोडून असेही पुनीयांनी या वेळी सांगितले.

जेटलींनी नेमकी तिच माहिती का टाळली?

अरूण जेटली यांनी त्यांच्या ब्लॉगमधून आतपर्यंतच्या सर्व बैठकांबाबतची माहिती दिली आहे. पण, नेमकी याच भेटीबद्दल माहिती देणे त्यांनी का टाळले? असा सवाल विचारत जेटली हे खोटं बोलत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच, देशातून बाहेर पळ काढण्याआधी आपल जेटली यांची संसदेत भेट घेतल्याचे स्वत: मल्याने म्हटल्याचेही राहुल गांधींनी सांगितले.

काय म्हणाले राहुल गांधी?

अर्थमंत्र्यांनी फरार आरोपी बरोबर चर्चा केली.

मल्या देश सोडून चालल्याचे जेटलींना माहिती होते. पण, त्यांनी, सीबीआय, ईडी किंवा पोलिसांना याची माहिती दिली नाही.

मल्ल्या अर्थमंत्र्याबरोबर संगनमत करुन देशाबाहेर पळून गेला.