Anti-Hijab Protests | प्रातिनिधिक (संग्रहित संपादित) प्रतिमा

इराणमध्ये हिजाब घालण्याविरुद्ध जोरदार निदर्शने (Iran Anti-Hijab Protests) सुरू आहेत. या आंदोलनात सर्वसामान्यांसोबतच अनेक सेलेब्जही सहभागी होत आहेत. हे आंदोलन इतर अनेक देशांमध्येही सुरु आहे. महिलांवरील सततच्या अत्याचाराच्या निषेधार्थ होत असलेल्या या आंदोलनाचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इराणच्या महसा अमिनी हिच्या मृत्यूविरोधात ही निदर्शने सुरू आहेत. आता इराणमधून सुरू झालेला हिजाबविरुद्धचा लढा भारतात पोहोचला आहे.

नोएडाच्या सेक्टर 15A मध्ये राहणार्‍या डॉक्टर अनुपमा भारद्वाज यांनी आपले केस कापून या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. त्यांनी याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर अनुपमा भारद्वाज केस कापताना दिसत आहेत. अशा प्रकारे हिजाबविरुद्धच्या क्रांतीची आग नोएडामध्ये पाहायला मिळाली. क्रांतीची ही ठिणगी पेट घेत असताना जगभरातील अनेक महिला पुढे येऊन इराणच्या महिलांना पाठिंबा देत आहेत.

डॉ. अनुपमा याबाबत म्हणतात, आपण 21 व्या शतकात आहोत. जग अंतराळात जाण्याबद्दल बोलत आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत आणि दुसरीकडे अशी प्रकरणे समोर येत आहेत. या घटना दुःखद आहेत. आज आपण कोणत्याही धर्माबद्दल बोलत नाही, तर ही बाब महिलांच्या हक्कांबद्दल आहे. देशात महिलांनाही अनेक समस्या भेडसावत आहेत, ज्याबाबत बोलणे आवश्यक आहे. धर्म आणि समाजाच्या नावाखाली महिलांचे शोषण समर्थनीय नाही. महिलांच्या हक्कांची गळचेपी होऊ शकत नाही. (हेही वाचा: इराणमध्ये हिजाब वादामुळे वातावरण तापल; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात आणखी 19 जणांचा मृत्यू)

इराणच्या महसा अमिनी या 22 वर्षीय मुलीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हा निषेध सुरु झाला आहे. महसाचा 16 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता, जिची चूक (इराण सरकारच्या मते) इतकीच होती की तिने परिधान केलेल्या हिजाबमधून तिचे थोडे केस दिसत होते. इराणमध्ये 18 दिवसांपासून हिजाबविरोधात सुरू असलेले आंदोलन थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता हायस्कूलच्या मुलीही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. याआधी प्रियांका चोप्रानेही हिजाब विरोधाला पाठिंबा दिला आहे.