ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारें (Anna Hajare) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुढील आठवडाभर त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काल सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या आज सकाळी करण्यात आल्या. मात्र, ८४ व्या वर्षीही हजारे यांचे मेडीकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत झाले. या वयात एवढे नॉर्मल रिपोर्ट अभावानेच पहायला मिळतात, असे रुबी रुग्णालयाचे प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी म्हटले आहे.
नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने काही वेळापूर्वी डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार अण्णा राळेगणकडे रवाना झाले आहेत. दरम्यान अण्णा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी फोनद्वारे अण्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. (हे ही वाचा Eknath Khadse यांनी मुंबई मध्ये घेतली Sharad Pawar यांची भेट; जळगाव च्या विकासासाठी जिल्ह्याला ताकद देण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा.)
अण्णांना रुग्णालयातून निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टिम उपस्थित होती. डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मखळे, डॉ. मुनोत यांनी अण्णांच्या सर्व तपासण्या केल्या. या वयातही अण्णांची प्रकृती ठणठणीत आहे. या एखाद्या डॉक्टरांना सुद्धा या वयात आपली प्रकृती एवढी चांगली ठेवणे शक्य नाही, असे सांगत डॉक्टरांनी अण्णांचे कौतूक केले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील एक आठवडा तरी कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा अग्रह करू नये, असे आवाहन हजारे यांच्या कार्यालयारतर्फे संजय पठाडे यांनी केले आहे.