राफेल करारानंतर फ्रान्स सरकारकडून अनिल अंबानींचा 1124 कोटी कर माफ; फ्रेंच मिडियाचा खळबळजनक दावा
Anil Ambani. (Photo Credits: File Image)

राफेल (Rafale) मुद्दा अजूनही संपूर्णपणे विरला नाही, नुकतेच सुप्रीम कोर्टाने राफेल बाबत परत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता फ्रेंच माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमुळे याबाबत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. फ्रेंच वृत्तपत्र ले माँड (Le Monde)च्या दाव्यानुसार, 2015 मध्ये राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानीं (Anil Ambani) च्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरोंची करमाफी दिली. तसेच या करारानुसार विमानचालन क्षेत्रात जवळजवळ कोणताही अनुभव नसूनही, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेंसला ऑफसेट पार्टनर बनवण्यात आले.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स अटलांटिक फ्लॅग फ्रान्स (Reliance Atlantic Flag France) कंपनीची फ्रान्सच्या कर अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू होती. त्यावेळी ही कंपनी 2007 ते 2010 या कालावधीमधील 60 दशलक्ष युरो कर भरण्यासाठी पात्र ठरली. मात्र कंपनीने 7.6 दशलक्ष युरो कर भरण्याची तयारी दर्शवली. या गोष्टीला फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि आणखी एक चौकशी सुरू केली. यानंतर 2010 ते 2012 या कालावधीतील व्यवहारांची चौकशी करण्यात आली.

(हेही वाचा: Rafale Deal:राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का)

त्यानंतर कंपनीला 91 मिलियन युरो इतका अतिरिक्त कर भरण्याची सूचना देण्यात आली. एप्रिल 2015 मध्ये मोदी सरकारने फ्रान्ससोबत राफेल कराराची घोषणा केली त्यावेळी, अंबानींना एकूण 151 मिलियन युरोंचा कर भरायचा होता. मात्र संपूर्ण राफेल करार पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांनी फ्रेंच कर अधिकारी समझोता करण्यासाठी राजी झाले. त्यानंतर फ्रान्स सरकारकडून अंबानींचा 143.7 दशलक्ष युरो कर माफ करून फक्त 7.6 दशलक्ष युरो कर घेण्यात आला. यावर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून, ‘हे प्रकरण 2008 मधले असून कंपनीला कोणत्याही प्रकारे झुकत माफ देण्यात आले नाही,’ असे रिलायन्सने एका निवेदनातून स्पष्ट केले आहे.