निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाबाबत महाराष्ट्र आणि गुजरातला अलर्ट देण्यात आला आहे. हे वादळ वायव्य दिशेकडे वाटचाल करत असून ते 3 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. तसेच या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे.

निसर्ग या चक्रीवादळाची तीव्रता पुढील 48 तासांमध्ये वाढू शकते. वायव्य दिशेकडे वाटचाल करत असून ते 3 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीवर 2 ते 4 जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणातल्या काही भागांमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- मुंबई: गोरगावमधील नेस्को प्रदर्शन केंद्राचे क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतर; सुविधांची पाहणी करण्यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट

एएनआयचे ट्वीट-

मच्छीमाराना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाउस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोविडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे.