एम. नागेश्वर सीबीआयचे नवे संचालक; 'ते' दोन्ही अधिकारी सक्तीच्या रजेवर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

देशातील सर्वात मोठी आणि आघाडीची तपास यंत्रणा म्हणून ‘सीबीआय’कडे पहिले जाते. मात्र सध्या सीबीआय प्रकाशझोतात आहे ती म्हणजे या संस्थेमध्ये चाललेल्या अंतर्गत शीतयुद्धामुळे, हे वादही आता जगजाहीर झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर वर्मा यांच्या जागी एम. नागेश्वर यांची अंतरिम संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागेश्वर राव 1986 च्या ओदिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

सीबीआयने क्रमांक दोनचे अधिकारी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला असून त्यांच्यावर मांस व्यापारी मोईन कुरेशी यांच्याकडून तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दरम्यान सीबीआयने आपलेच एक अधिकारी देवेंद्र कुमार यांच्यावर धाड टाकून त्यांना अटक केली होती. या अटकेचा संबंध राकेश अस्थाना यांच्यावरील आरोपांशी आहे. याच प्रकरणाबाबत सीबीआय प्रमुख आलोककुमार वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. यामुळे हे प्रकरण  आता न्यायालयापर्यंत पोहचले आहे.