Monsoon Session Of Parliament:  संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या 72 तासांपूर्वी सर्व खासदारांची कोविड-19 चाचणी केली जाणार
Monsoon Session Of Parliament (PC - ANI)

Monsoon Session Of Parliament: येत्या 14 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी, राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी आज कोविड-19 चाचणी केली. याशिवाय पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या 72 तासांपूर्वी सर्व खासदारांना कोविड-19 चाचणी करणं बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांनी 72 तासांच्या आत शासनाने अधिकृत केलेल्या कोणत्याही हॉस्पिटल, प्रयोगशाळेत किंवा संसद भवन संकुलात त्यांची कोविड चाचणी करुन घ्यावी. सदस्यांच्या सोयीसाठी आजपासून संसद भवन येथे तीन चाचणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. अधिवेशनासाठी संसद भवनात प्रवेश घेताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये,म्हणून सदस्यांनी आधीच त्यांचे चाचणी अहवाल नियुक्त ई-मेलद्वारे राज्यसभा सचिवालयात पाठवावे, अशी विनंतीही खासदारांना करण्यात आली आहे.

याशिवाय संसद सचिवालय व संसदेच्या आवारात कार्यरत अन्य एजन्सींचे कर्मचारी जे त्यांच्या कर्तव्यावर असताना संसद सदस्यांच्या संपर्कात येतात त्यांच्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, रिसेप्शन कार्यालय, संसद भवन येथे आजपासून खासदारांचे खासगी कर्मचारी आणि खासदारांच्या वाहनचालकांसाठी रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (हेही वाचा - ICMR Sero Survey Results: 'आयसीएमआर'च्या सीरो सर्वेक्षणामधून मोठा खुलासा; मेच्या सुरुवातीपर्यंत देशात तब्बल 64 लाख लोक Coronavirus संक्रमित)

शारीरिक अंतराच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी राज्यसभा कक्ष, सज्जा (गॅलरी) आणि लोकसभा कक्ष सदस्यांना बसण्यासाठी वापरले जाईल- त्यापैकी - 57 कक्षामध्ये आणि 51 राज्यसभेच्या गॅलरीमध्ये बसतील. उर्वरित 136 लोकसभेच्या सभागृहात बसतील. एकूण 244 सदस्य असून एक जागा रिक्त आहे. चर्चेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक आसन व्यवस्थेच्या (सीटला) येथे मायक्रोफोन आणि ध्वनी कन्सोल प्रदान करण्यात आला आहे. सभासदांच्या सुरक्षेचा विचार करता सदस्यांना बसून बोलण्याची परवानगी दिली जाणार आहे.