Odisha Train Accident: ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर (Train Accident) विमान कंपन्यांनी कोलकाता ते भुवनेश्वर, हैदराबाद, विशाखापट्टणम, बेंगळुरू, चेन्नई, कोची यांसारख्या दक्षिण भारतातील शहरांचे भाडे दोन पटीने वाढवले आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, रेल्वे अपघाताची बातमी पसरताच, विमान कंपन्यांनी या शहरांच्या फ्लाइटचे भाडे वाढवण्यास सुरुवात केली. कारण, रेल्वे मार्ग प्रभावित झाल्यामुळे लोक फ्लाइटचा पर्याय शोधत आहेत.
कोलकाता ते भुवनेश्वरचे भाडे जे पूर्वी 6,000-7,000 रुपये होते ते शनिवार आणि रविवारी 12,000-15,000 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत विशाखापट्टणमचे भाडे 5,000-6,000 रुपये होते, जे शनिवारी 14,000-16,000 रुपये झाले. (हेही वाचा -Odisha Train Accident: ओडिशातील अपघाताच्या 51 तासानंतर रेल्वेसेवा पुर्ववत, रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात)
रविवारी तेथे थेट विमानाचे भाडे 18 हजारांवर पोहोचले. कोलकाता-हैदराबादसाठी 6,000 रुपयांपासून सुरू होणारे भाडे 18,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सोमवारी कोलकाता ते हैदराबाद या नॉन-स्टॉप फ्लाइटचे सर्वात कमी भाडे रु. 15,000 आहे. सोमवारी कोलकाता ते चेन्नईचे भाडे सुमारे 20 हजार रुपये आहे.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने शनिवारी सर्व विमान कंपन्यांना भाड्यातील असामान्य वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते होऊ नये यासाठी पावले उचलण्याच्या कठोर सूचना जारी केल्या आहेत.