ATF Price Hike: विमान प्रवास महागणार! हवाई इंधनाच्या किमतीत 5 टक्के वाढ
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Instagram)

ATF Price Hike: येत्या काही दिवसांत तुम्हाला विमान प्रवासासाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण विमान कंपन्या विमान प्रवास महाग करू शकतात. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे विमान इंधनाच्या (एटीएफ) किमती 5.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यानंतर देशातील एटीएफच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एटीएफच्या किमतीत झालेली ही चौथी वाढ आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 103 व्या दिवशी स्थिर राहिले आहेत.

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितले की राष्ट्रीय राजधानीतील एटीएफची किंमत 4,481.63 रुपये प्रति किलो किंवा 5.2 टक्क्यांनी वाढून 90,519.79 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. (वाचा - Indian Railways: भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना पुन्हा देणार मोठी भेट, जाणून घ्या सविस्तर)

ही एटीएफची सर्वोच्च पातळी आहे. ATF ची किंमत ऑगस्ट 2008 मध्ये प्रति किलोलिटर रुपये 71,028.26 होती, जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल US$ 147 वर पोहोचली होती. मंगळवारी ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 93.87 वर होती. तेल कंपन्या दर पंधरवड्याला हवाई इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात. 1 मार्च रोजी आढावा घेतला असता हवाई इंधनाच्या किमती पुन्हा वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनाच्या किमती ठरवण्याचा अधिकार सरकारी तेल कंपन्यांना आहे. या कंपन्या हवाई इंधनाच्या दरात सातत्याने वाढ करत आहेत. मात्र उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत नाही. परंतु, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.