SCTIMST (PC - Twitter)

तिरूवनंतपूरममधील 'श्री चित्रा तिरूनल इन्स्टिट्युट फॉर मेडीकल सायन्सेस आणि टेक्नॉलॉजी'मधील (Sree Chitra Tirunal Institute for Medical Sciences and Technology) (SCTIMST) एका डॉक्टराला कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या डॉक्टरासोबतच्या तब्बल 30 सहकाऱ्यांनादेखील निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, 1 मार्च श्री चित्रा तिरूनल इन्स्टिट्युट फॉर मेडीकल सायन्सेस आणि टेक्नॉलॉजी'मधील एक डॉक्टर स्पेनमधून भारतात आले होते. त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांना त्रास जाणवू लागला. रविवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ते कोरोनाग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदिर 31 मार्चपर्यंत बंद राहणार)

कोरोना व्हायरसची लागण झाली असताना हे डॉक्टस रुग्णालयात आले होते. त्यामुळे त्यांच्या सहकार्यांनाही कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 30 डॉक्टरांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यातील काही डॉक्टर्स मागील आठवड्यात केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी होते. त्यामुळे या बैठकीला उपस्थित असणाऱ्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगवेगळा सल्ला दिला आहे. यात त्यांनी जनतेला अनावश्यक प्रवास टाळा, गरज नसल्यास कार्यालयात न जाता 'वर्क फ्रॉम होम' चा पर्याय निवडा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्या व्यक्तीची काळजी घ्या, आदी सुचना दिल्या आहेत.