देशातील या पाच महत्वाच्या विमानतळांंची जबाबदारी अदानी समूहावर; 50 वर्षांसाठी मिळाले कंत्राट
अदानी समूह (Photo Credit : Youtube)

मुंबईच्या वीज विभागात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता अदानी समुहा (Adani Enterprises Ltd) ने विमान उड्डाण क्षेत्रात प्रवेश केला आहे. नुकतीच देशातील सहा महत्वाच्या विमानतळांसाठी बोली लावण्यात आली होती, यामध्ये तब्बल 5 विमानतळांच्या बोलीसाठी अदानी समूहाला यश प्राप्त झाले. या 5 विमानतळांची जबाबदारी अदानी समूहाला देण्यात आली आहे, आणि हे कंत्राट तब्बल 50 वर्षांसाठी असणार आहे. यामध्ये लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, मंगळुरु आणि त्रिवेंद्रम या एयरपोर्टचा समावेश आहे. गुवाहाटी विमानतळासाठीही या समुहाने बोली लावली आहे, त्याचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे.

देशातील 5 मोठ्या विमानतळांची देखभाल, दुरुस्ती आणि अत्याधुनिकीकरणाचे संपूर्ण कंत्राट आता अदानी समूहाकडे असणार आहे. यामध्ये सर्वात जास्त बोली ही त्रिवेंद्रम विमानतळासाठी लावण्यात आली होती. केरळ राज्य औद्योगिक विकास महामंडळाला मागे टाकून अदानी ग्रुपने हा विमानतळ जिंकला आहे. 'मासिक प्रवासी शुल्क' या तत्त्वाच्या निकषावर अदानी समूहाला कंत्राट देण्यात आले. काही औपचारिक व्यवहार पूर्ण झाल्यावर अदानी समूहाकडे या विमानतळांची जबाबदारी देण्यात येईल. (हेही वाचा: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विक्रम; एका दिवसात सांभाळली 1007 विमानं)

या सहा विमानतळांसाठी 10 कंपन्यांनी 32 तांत्रिक बोली लावल्या. अहमदाबाद आणि जयपूर विमानतळासांठी प्रत्येकी 7-7 बोली लावल्या गेल्या. तर लखनऊ आणि गुवाहाटी विमानतळांसाठी प्रत्येकी 6-6, मंगळुरु आणि त्रिवेंद्रम विमानतळांसाठी प्रत्येकी 3-3 बोली लावण्यात आल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) आधारावर सहा एआयआय-संचालित विमानतळांचे व्यवस्थापन चालवण्याचा एक प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानुसार आता या पाच विमानतळांची खासगी भागीदारी अदानी समूहाकडे आली आहे.