File image of West Bengal Chief Minister Mamata Banerjee | (Photo Credits: PTI)

पश्चिम बंगाल (West Bengal) सह इतर राज्यांतील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन (Strike) सुरु आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक राज्यातील डॉक्टर संपावर गेले होते. या संपाचा सर्वात जास्त फटका बसला तो रुग्णांना, डॉक्टर संपावर असल्याने अनेक रुग्णालयात रुग्णाचे हाल होताना दिसत होते. अखेर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी शनिवारी संध्याकाळी संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, व डॉक्टरांना परत कामावर रुजू होण्याची साद घातली आहे.

यावेळी बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘10 जून रोजी डॉक्टरांवर झालेल्या हल्ला ही फार दुर्दैवी घटना आहे. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यास सरकार कटिबद्ध आहे. सध्या उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. आता राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्हाला आमच्या ताकदीचा वापर करायचा नाही. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आम्ही ठोस पावले उचलत आहोत. मला राज्यात एस्मा (ESMA) लागू करण्याची इच्छा नाही.’ याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक दिशानिर्देशक जारी करत, पश्चिम बंगाल सरकारकडून या आंदोलनाबाबत अहवाल मागवला होता. शुक्रवारी रात्री, आंदोलन करणऱ्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी राज्य सचिवालयामध्ये बैठक करणे टाळले होते. (हेही वाचा: पश्चिम बंगाल मध्ये डॉक्टरला मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांचा 17 जून ला संप, बंद असणार 'या' आरोग्य सुविधा)

दरम्यान, 10 जून रोजी कोलकात्यातील एनआरएस हॉस्पिटल मध्ये 75 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या कुटुंबियांनी एका कनिष्ठ डॉक्टरला मारहाण केली होती. डॉक्टरने पेशंटची काळजी घेण्यात निष्काळजीपण केला असा आरोप कुटुंबीयांनी लावला होता. त्यानंतर डॉक्टरांचे हे आंदोलन सुरु झाले.