महिलेला शिक्षा (Photo Credit : ANI)

कर्नाटकच्या बंगळूरू (Bengaluru) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने कर्ज फेडले नाही यासाठी शिक्षा म्हणून, तिला चक्क एका विद्युत खांबाला बांधून त्येवण्यात आले. एएनआय (ANI) ने याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. बंगळूरू जवळील कोडिगेहल्ली येथे ही घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये या महिलेला एका खांबाला बांधलेले असून, तिच्या आजूबाजूला जमाव उभा असलेला दिसत आहे. लोक तिचा अपमान असताना, जमावाने फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल केला गेला असून 7 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या पीडित महिलेचे नाव राजमणी असे असून, ती आपल्या मुलीसह बंगळूरूबाहेरील एका छोट्या भागात गेल्या एक-दोन वर्षांपासून राहत आहे. आपले घर चालवण्यासाठी ती एक भोजनालय आणि चिट फंड चालवते. व्यवसायासाठी तिने गावातील काही लोकांकडून 50,000 रुपये कर्ज घेतले होते. काही कारणास्तव ती ही रक्कम परत फेडू शकली नाही, त्यामुळे या लोकांनी तिला 13 जून रोजी,  जबरदस्तीने एका खांबाला अमानुषपणे बांधून ठेवले. (हेही वाचा: गतिमंद-सावत्र मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा)

गेले काही दिवस हे लोक आपले पैसे परत मिळवण्यासाठी राजमणीच्या घरी खेटे घालत होते. मात्र राजमणीशी त्यांची भेट होऊ शकली नाही.  गुरुवारी जेव्हा राजमणी त्यांना घरी दिसली, तेव्हा त्यांनी पकडून तिला एका खांबाला बांधले. या प्रकरणी 7 लोकांना अटक केली असून पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.