सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचा दिलदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. बाडमेरमध्ये आठ वर्षाच्या पाक मुलाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. सीमेवर नजर ठेवणाऱ्या बीएसएफ जवानांनी तातडीने त्याला पाकिस्तानला (Pakistan) परत पाठवले. बीएसएफ गुजरात फ्रंटियरचे उपमहानिरीक्षक एम.एल. गर्ग यांनी याची पुष्टी केली आहे. गर्ग यांनी सांगितलं की, शुक्रवारी सायंकाळी 5.20 च्या सुमारास 8 वर्षाच्या मुलाने अनवधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि बीएसएफच्या 83 व्या बटालियनच्या बीओपी सोमरटच्या सीमा स्तंभ क्रमांक 888/2-एसजवळ भारतीय सीमेवर प्रवेश केला.
गर्ग यांनी पुढे बोलताना सांगितलं की, जेव्हा बीएसएफच्या जवानांनी त्याला पकडले, तेव्हा तो घाबरून रडू लागला. बीएसएफ जवानानं त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काही चॉकलेट खायला दिले. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा पाकिस्तानमधील नगर पारकर येथील यमनू खान यांचा मुलगा आहे. त्याचं नाव करीम असं आहे. (वाचा - तेलंगणा: आंबे चोरी केल्याच्या संशयातून अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण, शेण खायला घालण्याच्या सुद्धा केला प्रयत्न)
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर बीएसएफने पाक रेंजर्ससमवेत फ्लॅग मीटिंग बोलावून मुलाच्या सीमा प्रवेशासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी 7.15 वाजता मुलाला पाकिस्तानी रेंजर्सकडे परत सोपविण्यात आले.
यापूर्वीदेखील अनेक वेळा भारताने उदारता दाखवली आहे. परंतु, पाकिस्तानचा दृष्टीकोन योग्य नव्हता. बाडमेरच्या बिजमेर पोलिस स्टेशन परिसरातील 19 वर्षीय तरुण गेमाराम मेघवाल याने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला नकळत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती. मात्र, पाकिस्तानने अद्याप त्याला भारताच्या स्वाधीन केलेले नाही.