
7th Pay Commission: नवीन वर्षासाठी फक्त 15 दिवसांचा कालावधी बाकी आहे. मोदी सरकार नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर देणार आहे. त्यानुसार, लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना नववर्षाचे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगानुसार हा निर्णय घेणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये मोदी सरकार महागाई भत्त्यामध्ये (डीए) 4 टक्क्यांची वाढ करणार असल्याचा अंदाज वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी वर्तवला आहे. महागाई भत्यात 4 टक्के वाढीला मंजुरी मिळाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुमारे 10 हजार रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2019 हे वर्ष संपण्याअगोदर ही खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. सध्या देशामध्ये प्रचंड महागाई आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. डीएमध्ये किती टक्क्यांनी वाढ कारायची हा निर्णय महागाईवर अवलंबून असतो. गेल्या 6 महिन्यातील महागाईचा दर पाहता नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार वाढ होऊ शकते, असा अंदाज कर्मचारी संघटनांनी वर्तवला आहे. (हेही वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय सरकारी विभागात 'या' ठिकाणी कामाची संधी; 39,100 रूपये पगार)
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्याच्या मुळ वेतनात 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. ही वाढ 1 जुलै 2019 पासून लागू झाली. सरकारने 2019-20 या कालावधीत महागाई भत्यांमध्ये वाढ केल्यास सरकारवर 15909.35 कोटी रुपयांचा बोजा पडेल. तसेच केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ 49.93 लाख कर्मचारी आणि 65.26 लाख पेंशन धारकांना मिळणार आहे. महागाई भत्यात वाढ केल्याने प्रत्येक वर्षी सरकारवर 8590.20 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. परंतु, सध्या देशाची आर्थिक स्थिती प्रतिकूल नाही. त्यामुळे सरकार नवीन वर्षांत कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.