सात वर्षीय मुलीचा कारनामा; शौचालय बांधत नाही म्हणून वडिलांना दिले पोलिसांच्या ताब्यात
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

दुसरी इयत्तेत शिकणारी हनीफा जरा (Hanifa Jara) हिला 'स्वच्छ भारत'ची ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) बनवण्यात आले आहे. तामिळनाडू राज्यातील वेल्लूर येथे राहणाऱ्या या मुलीच्या घरी शौचालय नव्हते, यामुळे या 7 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तिच्या घरी शौचालयाची निर्मिती केली. 7 वर्षीय हनीफा अंबुर परिसरात राहते.

हनीफाने तिच्या वडिलांच्या मागे शौचालय बनवण्याचा तगादा लावला होता, मात्र वडील नेहमीच ही गोष्ट टाळत आले. वर्गात पहिला नंबर आला की शौचालय बांधतो असे तिच्या वडिलांनी तिला सांगितले होते. हनीफा हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन पहिली आली मात्र तरी वडिलांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. शेवटी वडिलांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून चिडलेल्या हनीफाने पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली.

उघड्यावर शौचालयाला जाणे ही हनीफासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट होती. मात्र वडिलांची अट पूर्ण करण्यासाठी तिने वाट पहिली. शेवटी वडील ऐकत नाहीत म्हणून हनीफाने तिच्या आईला पोलिसांकडे घेऊन जाण्याची विनंती केली. आईने घरच्या आर्थिक परिस्थितीबाबत तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी हनीफा आपल्या जिद्दीवर ठाम राहिली. रविवारी रात्री ती जेवलीही नाही. शेवटी पोलिसांकडे जाऊन तिने तिची इच्छा पूर्ण करून घेतलीच.