Hoshiarpur Rape Case: पंजाबमध्ये 6 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या; आरोपीच्या घरात आढळला पीडितेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह
Hoshiarpur Rape accused| Representational Image (Photo Credits: File Image)

Hoshiarpur Rape Case: पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात एका 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून त्यानंतर तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा अर्धवट जळलेला मृतदेह टांडातील जलालपूर गावामधील एका घरात आढळला. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेचे शव पेटवून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, गुरप्रीत सिंग आणि त्याचे आजोबा सुरजित सिंग यांनी पीडितेवर बलात्कार आणि हत्या केल्या प्रकरणी आयपीसी आणि पोक्सो कायद्याच्या इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आहे. पीडिता ही याच गावात राहणाऱ्या प्रवासी मजूराची मुलगी होती.

पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, आरोपी गुरप्रीतने आपल्या मुलीला तिच्या घरी नेले आणि तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गुरप्रीत आणि सुरजीत दोघांनीही तिची हत्या केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह जाळला. आरोपीच्या घरात मुलीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. (हेही वाचा -  Madhya Pradesh: माता न तूं, वैरिणी! कुऱ्हाडीचे घाव घालून आईने केली 24 वर्षीय मुलाची हत्या; अंधश्रद्धेतून घडले कृत्य)

दरम्यान, पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षा तेजिंदर कौर यांनी या घटनेची स्वत: ची दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) होशियारपूर यांच्याकडून 26 ऑक्टोबरपर्यंत सविस्तर अहवाल मागविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी होशियारपूर जिल्ह्यातील टांडा येथील जलालपुर गावात आरोपीच्या निवासस्थानावर मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. या प्रकरणी आरोपींना भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत हत्या आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याशिवाय लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गतही आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे. अहवालानुसार, आरोपी गुरप्रीतने पीडितेला आपल्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणाचा पोलिस महासंचालकांना योग्य तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.