ग्रेटर नोएडा: दाट धुक्यामुळे कालव्यात कार कोसळून 6 जणांचा मृत्यू
Accident Due to Fog at Greater Noida (PC - ANI)

दिल्ली तसेच उत्तर भारतीय राज्यांमध्ये थंडीने कहर केला आहे. प्रचंड थंडीमुळे दिल्लीमध्ये सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे वाहतूकीवर मोठा परिणाम होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी मध्यरात्री ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) खेरली कालव्यात  (Kherli canal) कार कोसळल्याची घटना घडली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.

या कारमधील प्रवासी उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात राहतात. ते रविवारी मध्यरात्री दिल्लीला चालले होते. याचवेळी ग्रेटर नोएडातील सिकंदराबाद रोडवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. धुक्यामुळे रस्ता स्पष्ट न दिसल्याने त्यांची गाडी कालव्यात कोसळली. या गाडीमधून एकूण 11 जण प्रवास करत होते. दरम्यान, अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - थंडीमुळे उत्तर प्रदेशात 68 जणांचा मृत्यू; 8 राज्यात 'रेड अलर्ट' जारी)

रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, यातील 6 जणांना डॉक्टरांना मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, हे प्रवासी अर्टिगा गाडीने संभलवरुन दिल्लीला जात होते. महेश (वय- 35), किशन लाल (वय-50), नीरेश (वय-17), राम खिलाडी (वय -75), मल्लू (वय-12) आणि नेत्रपाल (वय -40) असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.