Maoists (Photo Credits: PTI/File)

बिहारमधील (Bihar) औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी उशिरा IED स्फोट झाला. माओवाद्यांनी (Maoists) बसवलेल्या प्रेशर इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा स्फोट झाला. या घटनेत सीआरपीएफच्या सहाय्यक कमांडंटसह 3 जवान जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 205 कोब्रा बटालियनने (Cobra Battalion) गेल्या दोन दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. ही मोहीम चाकरबंधा, लंगुराही आणि पंचरुखिया डोंगर आणि गया-औरंगाबाद सीमावर्ती जिल्ह्यांतील वनक्षेत्रांमध्ये राबविण्यात आली. औरंगाबादचे एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, शुक्रवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या गटामध्ये जोरदार गोळीबार झाला.

सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर गोळीबार सुरू करताच माओवाद्यांनी तेथे आयईडीचा स्फोट केला. या घटनेत कोब्राचे तीन जवान जखमी झाले आहेत. यामध्ये असिस्टंट कमांडंट बिभोर कुमार सिंग, रेडिओ ऑपरेटर-सह-हवालदार सुरेंद्र कुमार आणि सुमन पांडे यांचा समावेश आहे. तिन्ही जवानांना एअरलिफ्ट करून दिल्लीत आणण्यात आले आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. स्फोटानंतर सर्व जखमी जवानांना मदनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

प्रकृती चिंताजनक पाहून प्राथमिक उपचारानंतर सर्वांना गया येथील अनुग्रह नारायण मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमी जवानांना घटनास्थळावरून बाहेर काढण्यासाठी अडीच तासांपेक्षा जास्त वेळ लागल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पाटणा येथील सीआरपीएफ पीआरओने सांगितले की, सहाय्यक कमांडंट आणि कॉन्स्टेबलसह दोन जखमींना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हेही वाचा Clubhouse App Case: क्लबहाऊस अॅप प्रकरणातील तरुण आरोपीचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

मदनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करीबाडोह जंगलात आयईडी स्फोट झाला, नक्षलवाद्यांच्या खबरीनंतर कोब्रा बटालियनने परिसरात शोध मोहीम राबवली.  सीआरपीएफचे विशेष डीजी नितीन नवीन, आयजी पाटणा सेक्टर आणि आयजी गया रेंज यांनी मदनपूर पोलिस स्टेशन परिसराला भेट दिल्यानंतर एका आठवड्यानंतर ही घटना घडली आहे. राज्यातील काही धोकादायक भागात नक्षलवाद्यांशी सामना करण्याच्या रणनीतीचा आढावा सर्व अधिकाऱ्यांनी घेतला होता. झारखंडच्या पलामू जिल्ह्याच्या सीमेवर हा दुर्गम भाग असल्याने नक्षलवाद्यांचा येथे खोलवर प्रवेश आहे. त्यामुळेच या भागात योग्य ती घुसखोरी करण्यात सुरक्षा दलांना अपयश आले आहे.