Cyber Attack: या 'Email Id' पासून सावधान! चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

चीनच्या कुरापती काही थांबायच्या नाव घेताना दिसत नाही. भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनने आता भारताविरुद्ध नवे हत्यार उपसले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार चीन भारतावर 21 जुनपासून सायबर हल्ला (Cyber Attack) करण्याच्या तयारीत आहे. हा हल्ला इमेलच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लान केला आहे, असे या अहवालात म्हटले गेले आहे. महत्वाचे म्हणजे, ‘ncov2019.gov.in’ या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतात इंटरनेट यूझर्सवर मोठ्या सायबर हल्ल्याची भीती वर्तवत सरकारने खबरदारीचा इशारा दिला आहे. वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्यासाठी व्यक्ती किंवा व्यवसायांना ‘कोविड’वर मोफत उपचाराचे आमिष दाखवून बळी पाडले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारताची सायबर सिक्युरिटी एजन्सी ‘सीईआरटी-इन’ने सावधतेचा इशारा दिला आहे. सरकारी वित्तीय मदतीच्या वितरणावर देखरेखीचे काम करणाऱ्या सरकारी संस्था, शासकीय विभाग आणि व्यापारी संस्था यांच्यावर संभाव्य हल्ले होण्याची भीती वर्तवली आहे. हे देखील वाचा- पंतप्रधान मदत निधीचा बनावट UPI -ID तयार करून सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा; सायबर क्राईम पोलिसांनी जाहीर केली Fake वेबसाईटची यादी

सीईआरटी-इनचे ट्विट-

ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक सायबर हल्ले झाले आहे. या हल्ल्यामागे चीनचा हात असल्याचा संशय आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी अनेकदा चौकशी करण्यास सांगितले असता असे हल्ले अधिक तीव्र झाले असल्याचे समोर आले आहे.‘वारंवार होणाऱ्या सायबर हल्ल्यांसाठी चीनला जबाबदार धरले जात आहे. या हल्ल्यामागे चीनचा हात असल्याचा पूर्ण विश्वास आहे’ असे ऑस्ट्रेलियन सरकारच्या सूत्रांनी शुक्रवारी सांगितले होते. त्यामुळे भारतातील लोकांनी देखील अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार रहायला हवे.