
Bihar Assembly Elections 2025: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections 2025) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी जनतेला दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना 125 युनिट वीज मोफत देचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय लागू झाल्यानंतर राज्यातील तब्बल 1 कोटी 67 लाख कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे.
125 युनिट वीज मोफत -
नितीश कुमार यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत याबाबत घोषणा करताना म्हटलं आहे की, 'आम्ही सुरुवातीपासून सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता, 1 ऑगस्टपासून, 125 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. हे विजेचे बिल जुलैपासून लागू होईल.' यासोबतच, राज्य सरकारने पुढील तीन वर्षांत घरगुती ग्राहकांच्या सहमतीने त्यांच्या घरांवर किंवा जवळील सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. सौर ऊर्जा निर्मितीत बिहारने मोठी झेप घेतली असून 10 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. (हेही वाचा -Passport Verification in Maharashtra: महाराष्ट्रात पासपोर्ट व्हेरिफिकेशन पत्ता पडताळणी केंद्राच्या एसओपीनुसारच- गृह राज्यमंत्री)
कुटीर ज्योती योजनेअंतर्गत गरीबांसाठी विशेष मदत -
दरम्यान, सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत गरीब कुटुंबांना कुटीर ज्योती योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण खर्च उचलणार आहे. उर्वरित खर्चासाठीही सरकार मदतीचा हात देणार आहे. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत म्हटले की, 'या सर्व योजना आमच्या घोषणापत्रातील होत्या. पराभवाची भीती वाटू लागल्याने नितीश सरकार आमच्या योजनांचीच अंमलबजावणी करत आहे.'
निवडणुकांच्या तोंडावर नितीश कुमार यांचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून त्याचा प्रभाव मतदारांवर कसा होतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी निवडणुकीत नितीश कुमार यांना या घोषणांचा मोठा राजकीय फायदाच होण्याची शक्यता आहे.