Marathi Actors Who Passed Away in 2019: 2019 या वर्षात मराठी नाट्य व सिनेसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार काळाच्या पडद्याआड गेले, कोणी वाढत्या वयोमानामुळे तर कोणी आजारपणामुळे. काल झालेल्या 'नटसम्राट' श्रीराम लागू यांच्या निधनाने तर संपूर्ण मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. या आधी विजू खोटे, रमेश भाटकर यांसारख्या अष्टपैलू कलाकारांना देखील आपल्याला या वर्षात निरोप द्यावा लागला. जाणून घेऊया, या वर्षी निधन पावलेल्या मराठी कलाकारांविषयी ही माहिती...
श्रीराम लागू
मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'नटसम्राट' म्हणून ओळखते अशा डॉ. श्रीराम लागू यांचे काल (17 डिसेंबर रोजी ) निधन झाले. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या एकापेक्षा एक मराठी चित्रपट ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने गाजवले असे हे श्रीराम लागू. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, वयाच्या 92 व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विजू खोटे
शोले चित्रपटातील 'कालिया' ही अजरामर भूमिका साकारणारे व मराठी सोबतच बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे 30 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. 'अशी ही बनवाबनवी', 'आयत्या बिळावर नागोबा' यासारख्या अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर बॉलीवूड मधील, ‘अनोखी रात’, ‘जिने की राह’, ‘पगला कही का’, ‘रामपूर का लक्ष्मण’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
रमेश भाटकर
2019 या वर्षाच्या दुसऱ्याच महिन्यात, मराठी सिनेसृष्टीने एक हुरहुन्नरी कलाकार गमावला. 'वर्ल्ड कॅन्सर डे' च्याच दिवशी रमेश भाटकर यांचे कर्करोगामुळे निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या हिंदी टीव्ही मालिका विशेष गाजल्या तर 90 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
श्रीराम कोल्हटकर
अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे 3 ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. श्रीराम कोल्हटकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. ‘आपला माणूस’, ‘एक अलबेला’, ‘करले तू भी मोहब्बत’ अशा विविध चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली असून त्यांना मराठीतील चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळखलं जायचं.
अरुण काकडे
ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे उर्फ काकडे काका यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. साठहून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या काकडे काकांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठी नाट्य चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड हरपल्याने संपूर्ण नाट्यसृष्टीत शोककळा पसरली होती.
बिग बॉस मराठी 2 ते अग्गंबाई सासूबाई हे आहेत 2019 मधील Top 10 मराठी शो Watch Video
किशोर प्रधान
2019 या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात मराठी सिनेसृष्टीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा एक कलाकार गमावला. 12 जानेवारी 2019 रोजी ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन झाले. ते तेव्हा 83 वर्षांचे होते. विशेष म्हणजे मराठी रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, मराठी चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि जाहिराती अशा विविध माध्यमांत त्यांनी काम केलं होतं.