'मणिकर्णिका' आणि 'ठाकरे'चे पोस्टर्स (Photo Credits: Twitter)

25 जानेवारीला बहुप्रतीक्षित ‘ठाकरे’ (Thackeray) आणि ‘मणिकर्णिका’ (Manikarnika) चित्रपट प्रदर्शित झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट मराठी लोकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाला आहे, तर कंगनाच्या महत्वाकांक्षी माणिकर्णिकाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या दोन्ही चित्रपटांचा विषय पूर्णतः वेगळा असल्याने दोन्ही चित्रपटांचे प्रेक्षकही वेगळे आहे. एकच दुवा दोन्ही चित्रपटांमध्ये समान आहे तो म्हणजे दोन्ही चित्रपट बायोपिक आहेत. तरी ठाकरे पेक्षा मणिकर्णिकावर जास्त खर्च करण्यात आला आहे त्यामुळे कंगनाला या चित्रपटामधून तसाच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. सध्याची आकडेवारी पाहता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचा ठाकरेला चांगलाच फायदा होईल असे दिसत आहे.

पहिल्या दिवशी ठाकरेची कमाई 6 करोड इतकी होती. तर मणिकर्णिकाने 8.75 करोड इतका गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी ठाकरेने 9 कोटीचा व्यवसाय केला आणि मणिकर्णिकाने 18.10 कोटीचा. ठाकरेची आतापर्यतची एकूण कमाई 15 करोड झाली आहे आणि मणिकर्णिकाची 26.85 कोटी इतकी. हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये मणिकर्णिका प्रदर्शित झाला आहे. ठाकरे हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित झाला आहे. सध्याची आकडेवारी पाहता हे चित्रपट पुढील काही दिवसामध्ये आणखी कमाई करु शकतील अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मात्र एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांच्या कमाईच्या आकडेवारीमध्ये ‘मणिकर्णिका’ने ‘ठाकरे’वर मात केल्याचेच एकंदरीत दिसून येत आहे. (हेही वाचा : Thackeray Movie Review)

दरम्यान मणिकर्णिकाचे मूळ दिग्दर्शक क्रिश यांनी परत कंगनावर आरोप केले आहेत. कंगनाने सर्व काही आपल्याला हवे तसे जमवून आणले आहे, तिने इतरांना काही स्थान दिले नाही. वेळप्रसंगी तिने इतिहासामध्येही छेडछाड केल्याचे क्रिश यांचे म्हणणे आहे. तसेच तमिळ रॉकर्स या वेबसाईटने चित्रपट रिलीज झाल्याच्या एक दिवसाच्या आतच चित्रपटाची संपूर्ण कॉपी ऑललाईन लीक केली आहे. या गोष्टीचा फटकाही मणिकर्णिकाच्या निर्मात्यांना बसत आहे. तमिळरॉकर्स वेबसाईटने मणिकर्णिका व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'ठाकरे', विक्की कौशलचा 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक', 'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर', रजनीकांत यांचा 'पेटा' आणि 'विश्वासम' हे चित्रपटही ऑनलाईन लीक केले होते.