मुंबईमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे रहदारीचे रस्ते बंद करून शूटिंग करणार्‍यांविरोधात कारवाईची वेब मीडीया असोसिएशन ची मागणी
Film Shooting | Pixabay.com

मुंबई मध्ये ट्राफिकची मोठी समस्या आहे. यामध्ये आता गोरेगाव फिल्मसिटी अंतर्गत काही फिल्म, सिरियल, जाहिरात यांचं काम करणार्‍या प्रोडक्शन कंपन्या बेकायदेशीरपणे रस्ता बंद करून मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी शुटिंग करत असल्याचं समोर आलं आहे. या शूटिंग दरम्यान रस्त्यावर बराच पसारा करून ठेवलेला असतो. आता या प्रकारामुळे सामान्य मुंबईकर नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी याबाबत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व  मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, फिल्म सिटी व्यवस्थापकीय संचालक व सीईओ यांच्याकडे तक्रार पाठविण्यात आली आहे. सोबतच नागरिकांनाही या प्रोडक्शन कंपन्यांविरोधात तक्रार करण्यासाठी वेब मीडीया असोसिएशन कार्यालय कडे webm.association@gmail.com तसेच 9967717171/8788964050 वर माहिती देण्याचंही आवाहन केले आहे.

दरम्यान अशाप्रकारच्या शूटिंगसाठी प्रोडक्शन कंपन्यांना मुंबई ट्राफिक पोलिस, स्थानिक पोलिस स्टेशन, बीएमसी वॉर्ड ऑफिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, रोड सेफ्टी कार्यालय, हायवे ट्राफिक, फायर ब्रिगेड यांची परवानगी लागते पण अनेक कंपन्यांकडे ती परवानगी देखील नसते. कमी वर्दळीची वेळ पाहून काम केलं जातं. पण जेव्हा नागरिक त्यांच्याकडे विचारणा करतात तेव्हा धातूर मातूर कागद दाखवून अनेक प्रोडक्शन कंपन्या बेकायदेशीरपणे काम करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

वेब मीडीया असोसिएशन कडून रात्री-अपरात्री, सकाळी अशाप्रकारे रस्ते बंद करून बेकायदेशीरपणे शूटिंग करणार्‍या कंपन्यांच्या चौकशीचे आणि कार्यवाहीची मागणी केली आहे.