रंगभूमीवरील ‘बंडखोर’अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन
अभिनेत्रे लालन सारंग

विविध नाटके व भूमिकांतून ज्यांनी रंगभूमीवर स्वत:ची स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. काही नाटकांमुळे रंगभूमीवरील ‘बंडखोर’अभिनेत्री अशी ओळखही त्यांना मिळाली, अशा ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे पुण्यात, शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. त्या 79 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वृद्धापकाळाने लालन सारंग यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सुरुवातीला मुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून लालन सारंग यांची अभिनयाला सुरुवात झाली.‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, उद्याचा संसार’ इत्यादी अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या. मात्र लालन सारंग यांच्या अभिनय प्रवासात ‘सखाराम बाईंडर’ नाटक मैलाचा दगड ठरले.  या नाटकातील त्यांनी साकारलेली ‘चंपा’ ही भूमिका फारच लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर ‘रथचक्र’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’, ‘घरटे आपुले छान’, ‘बेबी’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’ आदी नाटके त्यांनी केली. ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपट तसेच ‘रथचक्र’ ही हिंदी मालिकाही त्यांनी केली.

तर अशा प्रकारे नाटक, सिनेमा आणि टिव्ही अशा तीनही क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या तसेच अभिनयापासून सुरू झालेला ज्यांचा प्रवास लेखिका, एकपात्री कार्यक्रम सादरकर्त्यां ते हॉटेल व्यावासायिक, उद्योजिका पर्यंत चालला अशा लालन सारंग यांनी आज अखेरचा श्वास घेतला.