लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री Naga Jhansi ची आत्महत्या; बॉयफ्रेंडशी भांडण झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
Naga Jhansi (Photo Credits: Twitter)

लोकप्रिय तेलुगू टीव्ही अभिनेत्री (Telugu TV Actress) नागा झांसी (Naga Jhansi) हीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैद्राबाद येथील निवासस्थानी गळफास घेत या अभिनेत्रीने आपली जीवनयात्रा संपवली. बॉयफ्रेंड सुर्या अका नागी (Surya aka Nani) याच्याशी भांडण झाल्यामुळे 21 वर्षांच्या या अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलले. झासी आणि नागी गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र नागीच्या पालकांचा या नात्याला विरोध होता.

शेजारच्यांनी अभिनेत्रीच्या निधनाची माहिती देताच पोलिस तातडीने अभिनेत्रीच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर मृतदेह गांधी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. सध्या पोलिस पोस्टमार्टमच्या रिपोर्टची वाट पाहत असून रिपोर्ट्स हाती आल्यानंतर पोलिस तपासाला अधिक गती येईल.

तेलुगू मालिका 'पवित्र बंधम' (Pavithra Bandham) यातील भूमिकेमुळे झांसी प्रसिद्धी झोतात आली होती. तिच्या मृत्यूने तेलुगू टेलिव्हिजन सृष्टी एका उभरत्या कलाकाराला मुकली आहे.

झांसी ही मुळची आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील असून सध्या कामानिमित्त ती हैद्राबाद येथील श्रीनगर कॉलनीत एकटीच राहत होती.