NCB आता टीव्ही इंडस्ट्रीमध्येही करणार ड्रग्ज प्रकरणाची चौकशी; टीव्ही कपल Abigail Pande आणि Sanam Johar यांना एनसीबीने बजावला समन्स
Sanam Johar and Abigail Pande (Photo Credits: Instagram)

सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) प्रकरणात सध्या ड्रग्स अँगल (Drug Case) प्रकरणात चौकशी सुरू आहे. एनसीबीने (NCB) ड्रग पेडलिंगचे आरोपी अनुज केशवानी आणि राहिल यांच्या चौकशीत, टीव्ही स्टार्स अबिगैल पांडे (Abigail Pande) आणि सनम जोहर (Sanam Johar) यांची नावे उघडकीस आली होती. त्यानंतर त्यांना एनसीबीने समन्स बजावले आणि ते चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. दरम्यान, गुरूवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अबिगैल पांडे व सनम जोहर यांच्या घरावर छापा टाकला. आज तकच्या अहवालानुसार छापाच्या वेळी त्यांच्या घरातून अल्प प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गुरुवारी अबिगैल आणि सनम या दोघांचीही चौकशी केली जात आहे.

सनम आणि अबिगैल यांना 24 सप्टेंबर 2020 रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या जोडप्याच्या जुहू निवासस्थानी 23 सप्टेंबरला एनसीबीने छापा टाकला होता व तब्बल 5 तासांहून अधिक काळ येथे तपासणी केल्याची माहिती मिळाली आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, अंमली पदार्थ नियंत्रण पथकाने अटक केलेल्या आणखी एका मादक पेडलर करमजीतने टीव्ही इंडस्ट्रीतील जवळपास 20 जणांची नावे घेतली आहेत, जे त्याचे कथित ग्राहक होते. टीव्हीवरील जोडपे, अबीगैल पांडे आणि सनम जोहर हे दोघेही डान्सर आहेत त्यांनी बरेच टीव्ही शो एकत्र केले आहेत. (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी)

दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांनाही एनसीबीने समन्स बजावला आहे. ड्रग्ज प्रकरणात यांचीही  चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज दीपिका पदुकोण व सारा अली खान या दोघीही गोव्यावरून मुंबईला येण्यासाठी निघाल्या आहेत. या प्रकरणात नॉरकोटिक्स कंट्रोल ब्युरोने 9 सप्टेंबर रोजी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना अटक केली होती. रियावर सुशांतसाठी ड्रग्सची व्यवस्था केल्याचा आरोप आहे.