सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये (Sushant Singh Rajput Death Case) सध्या एनसीबी (NCB) ड्रग्ज संबंधित (Drug Case) गोष्टींची चौकशी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये बॉलीवूडमधील अनेक मोठ मोठ्या कलाकारांची नावे समोर येत होती. आता अंमली पदार्थ प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने, अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shradhha Kapoor) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांना समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसांत सर्वांना चौकशीसाठी हजर राहावे लागेल. काल दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) ला एनसीबीने समन्स बजावले होते.
पहा एएनआय ट्वीट -
Narcotics Control Bureau issues summons to Deepika Padukone, Sara Ali Khan, Shradhha Kapoor and Rakul Preet Singh in a drug case related to Sushant Singh Rajput death case pic.twitter.com/djhAIj8Lfj
— ANI (@ANI) September 23, 2020
एनसीबीला जया साहाची मॅनेजर करिश्माचे एक व्हॉट्सअॅप चॅट मिळाले आहे, ज्यामध्ये ती ड्रग्जच्या खरेदी-विक्रीबद्दल बोलत आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप चॅटमधील 'डी' म्हणजे दीपिका पादुकोण आहे. या हायप्रोफाईल ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारी तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणात लोकांची विचारपूस करत आहे. एनसीबीने यापूर्वी KWAN कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर, जया साहा, श्रुती मोदी यांच्यासह चार जणांची चौकशी केली आहे. यापूर्वी रिया चक्रवर्तीने एनसीबीच्या चौकशीत 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेतली होती.
दरम्यान, दीपिका पादुकोण सध्या गोव्यात असून, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासमवेत शकुन बत्राच्या पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. अहवालानुसार ती या विषयावर निवेदन देणार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रकुलचे नाव चर्चेत होते आणि अभिनेत्रीने माध्यमांना रिपोर्टिंग करताना संयम दाखवायला सांगितले होते. श्रद्धा कपूरही सुशांत सिंह राजपूतच्या लोकप्रिय 'छीछोरे' चित्रपटातील नायिका आहे, तर सारा अली खानचा पहिला चित्रपट 'केदारनाथ'मध्ये सुशांतने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. (हेही वाचा: रिया व शोविक चक्रवर्ती च्या जामीन अर्जावरची आजची सुनावणी पावसामुळे टळली, निकालासाठी उद्यापर्यंत प्रतिक्षा)
या प्रकरणात नॉरकोटिक्स कंट्रोल ब्युरोने 9 सप्टेंबर रोजी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना अटक केली होती. रियावर सुशांतसाठी ड्रग्सची व्यवस्था केल्याचा आरोप आहे.