Ketaki Chitale Granted Bail: अभिनेत्री केतकी चितळेला मोठा दिलासा; ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर, 15 मे रोजी झाली होती अटक
Ketaki Chitale (Photo Credit: Twitter)

शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी गेल्या महिनाभरापासून तुरुंगात असलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी तिच्या जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात अचानक यू-टर्न घेत, अभिनेत्रीच्या जामिनाला विरोध न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट शेअर केल्याच्या आरोपावरून तिला 15 मे रोजी अटक करण्यात आली होती.

अभिनेत्री केतकी चितळे ही सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती तिच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट शेअर केली होती. यामध्ये अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट केतकीने शेअर केली होती. तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती.

केतकीच्या आक्षपार्ह पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले होते. राज्यभरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली जात होती. केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात बदनामी करणे, तेढ निर्माण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याआधी पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याच्या आरोपावरून फार्मसीचा 23 वर्षीय विद्यार्थी निखिल भामरे यालाही अटक करण्यात आली होती. भामरेला नाशिकमध्ये अटक करण्यात आली होती. आता भामरेलाही जमीन मंजूर करण्यात आला आहे. (हेही वाचा: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची राहत्या घरी आत्महत्या)

दरम्यान, केतकी चितळेच्या प्रकरणात महिला आयोगानेही उडी घेतली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपीला नोटीस बजावली होती. तसेच बदनामीची तक्रार वैयक्तिकरित्या शरद पवार यांच्याकडून आली नव्हती, ती त्यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती. जोपर्यंत संबंधित व्यक्तीकडून तक्रार येत नाही तोपर्यंत ती दखलपात्र नसते त्यामुळे कोणत्या कारणास्तव केतकीला अटक करण्यात आली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.