ALT Balaji चे माजी सीओओ Zulfiqar Khan गेल्या अडीच महिन्यांपासून केनियातून बेपत्ता; मित्रांनी केले मदतीचे आवाहन
Zulfiqar Khan (संग्रहित संपादित प्रतिमा)

बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडची पूर्ण मालकीची कंपनी असलेल्या ALTBalaji चे माजी ग्रुप COO झुल्फिकार खान (Zulfiqar Khan) गेल्या अडीच महिन्यांपासून बेपत्ता असल्याची बातमी समोर येत आहे. खान जवळ जवळ 80 दिवसांपासून केनियातून बेपत्ता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खान यांचे मोहम्मद झैद सामी किडवाई आणि स्थानिक टॅक्सी ड्रायव्हर निकोडेमस मवानिया यांच्यासोबत जुलैच्या मध्यात ओले सेरेनी परिसरात अपहरण करण्यात आले होते.

आता ते इतके दिवस बेपत्ता असल्याने खान यांच्या हितचिंतकांनी आणि परिचितांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी केनिया आणि भारत सरकारकडून खान यांचा शोध घेण्यासाठी त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. 'एबीपी नेटवर्क'चे सीईओ अविनाश पांडे यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'माझा मित्र आणि माजी सहकारी झुल्फिकार खान केनियातून जवळपास 70 दिवसांपासून बेपत्ता आहे. आम्हाला त्याच्या सुरक्षेची काळजी आहे आणि त्याच्या सुरक्षित परतीची इच्छा आहे.’ या ट्विटमध्ये त्यांनी भारत सरकार आणि केनिया सरकारलाही टॅग केले आहे.

'हाऊस ऑफ चीअर'चे संस्थापक आणि 'व्हायकॉम18'चे माजी सीओओ राज नायक यांनीही झुल्फिकार खानबद्दल चिंता व्यक्त करणारे ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'स्टार टीव्हीमधील आमचे माजी सहकारी आणि बालाजी टेलिफिल्म्सचे माजी ग्रुप सीओओ झुल्फिकार खान केनियाला गेले होते, पण ते दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या सुरक्षित पुनरागमनाची आम्हाला आशा आहे. कृपया मदत करा.' (हेही वाचा: World War III: युक्रेन NATO मध्ये सामील झाल्यास होऊ शकते तिसरे महायुद्ध; रशियाचा इशारा)

खान यांनी ते बेपत्ता होण्याच्या दोन दिवस आधी 21 जुलै रोजी इंस्टाग्रामवर शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी प्रसिद्ध मसाई मारा नॅशनल पार्कला दिलेल्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.