Shafiq Ansari (Photo Credits: Twitter)

2020 या वर्षामध्ये अजून किती मृत्यू पाहायला लागणार आहेत कोण जाणे... अजून ऋषी कपूर, इरफान खान यांच्या जाण्याचे दुःख असताना आता, 'क्राइम पेट्रोल' (Crime Patrol) फेम शफीक अन्सारी (Shafiq Ansari) यांनी काल, 10 मे रोजी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या या अभिनेत्याला काल श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याबाबत सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने अन्सारी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शफीक अन्सारी यांच्या निधनामागील कारण म्हणजे पोटाचा कर्करोग असल्याचे सांगितले जात आहे.

शफीक अन्सानी हे बर्‍याच दिवसांपासून टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'क्राइम पेट्रोल'चा एक भाग होते. मुंबईच्या मदनपुरा भागातील रहिवासी असलेल्या शफीक अन्सारी यांना पोटाचा कर्करोग होता. बर्‍याच वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले. शफीक अन्सारी यांची पत्नी गौहर अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शफीक यांची तब्येत दिवसभर ठीक होती,  परंतु सायंकाळी साडेपाच वाजता त्यांची तब्येत खालावली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अन्सारी यांचे वय 52 वर्षे होते व ते तीन मुली, पत्नी आणि आईसह मुंबईत राहत होते.

(हेही वाचा: सुप्रसिद्ध संगीत कंपनी T-Series मध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मुंबई महापालिकेने केली संपूर्ण बिल्डिंग सील)

शफीक अन्सारी यांनी लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. 2003 मधील अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या बागबान चित्रपटाचे ते पटकथा लेखक होते. दरम्यान, 12 दिवसांत सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित तीन दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला. 29 एप्रिलला इरफान खान आणि 30 एप्रिलला ऋषी कपूर यांचा कर्करोगाच्या आजारामुळे मृत्यू झाला.