अभिनेत्री मोहिना कुमारीसह, पती, सासू-सासरे अशा घरातील 7 जणांना कोरोना विषाणूची लागण
Mohena Kumari Singh and in laws test positive for COVID-19 (Photo Credits: Instagram)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत जसजशी वाढ होत आहे तसतसे, याच्या झळा आता सेलेब्ज, खेळाडू किंवा इतर काही महत्वाच्या लोकांना बसू लागल्या आहेत. आता टीव्ही अभिनेत्री मोहिना कुमारीच्या (Mohena Kumari Singh) कुटूंबाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अभिनेत्री मोहिनासह तिच्या कुटुंबातील सात जणांची कोरोना व्हायरसची चाचणी सकारात्मक आली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्री सध्या उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तिच्या घरी आहे. मोहिनाला 31 मे रोजी ऋषिकेशमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहिना कुमारी उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराजांची सून आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळे मोहिना लोकप्रिय झाली होती.

मोहिनासोबत तिचे पती सुयेश रावत, तिचे सासरे आणि उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज, सासू अमृता रावत आणि इतर कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोहिना कुमारी सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांचा कोठी परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे.

मनोरंजन वेब पोर्टल स्पॉटबॉयशी बोलताना मोहिना कुमारी सिंह म्हणाली, 'आम्ही सध्या इस्पितळात आहोत. माझे आणि कुटुंबातील बरेच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आम्हाला हा रोग कसा झाला हे आम्हाला माहिती नाही. आमच्याबरोबर घरी अनेक लोक राहतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या क्वार्टर आहेत. सध्या माझ्या कुटुंबातील 7 लोक कोरोना विषाणूबाधित आहेत. बाकीचे आमच्या संस्थेशी संबंधित आहेत.’

ती पुढे म्हणाली, ‘जरी आम्ही सर्व जण कोरोना पॉझिटिव्ह असलो तरी, आम्हाला या विषाणूची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत व हेच कारण आहे की, कोणालाही या विषाणूबाबत कळू शकले नाही आणि कोरोना विषाणू घरात पसरला. आमच्यावर सध्या उपचार सुरू आहेत व घरी पोहोचल्यावर आम्ही सर्वजण आयसोलेशनमध्ये राहणार आहोत. सध्या आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत.’ (हेही वाचा: अजय देवगणची धारावीसाठी मोठी मदत; नवीन रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर आणि व्हेंटिलेटर केले दान)

दरम्यान, मध्य प्रदेशातील रीवा राजघराण्यात जन्मलेल्या मोहिना कुमारीने आपल्या करिअरची सुरुवात 'डान्स इंडिया डान्स' च्या सीझन 3 मध्ये केली होती. यानंतर ती 'दिल दोस्ती डान्स'मध्ये दिसली होती.