मुंबईत भररस्त्यात अज्ञातांकडून अभिनेत्री गंगा हिला मारहाण; व्हिडिओ शेअर करत सांगितला धक्कादायक प्रसंग
Actress Ganga (Photo Credits: Instagram)

मुंबईतील (Mumbai) भररस्त्यात 'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री गंगा (Ganga) हिला अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली आहे. शूटिंग संपवून घरी परतत असताना तिच्यावर हा धक्कादायक प्रसंग ओढावला. शूटिंग संपल्यानंतर गंगा नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर बसची वाट बघत होती. त्यावेळेस त्या ठिकाणी काही लोकं आली आणि त्यांनी गंगाला मारायला सुरुवात केली. त्यातून कसाबसा मार्ग काढत गंगाने घर गाठले. मात्र हल्ला करणारी माणसं कोण होती? त्यांनी गंगाला मारहाण का केली? याविषयी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. खुद्द गंगाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत झालेला प्रसंग शेअर केला आहे.

गंगाने अत्यंत रडवेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत हा व्हिडिओ शूट केला आहे. यात ती म्हणते की, "बसस्टॉपवर बसची वाट पाहत असताना काही अज्ञात व्यक्तींनी कोणतेही कारण नसताना मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मला कळतं नाही मी पुढे काय करु? कुठे जाऊ? कोणीतरी मला सांगा मी काय करायला हवे? हे खूप भयंकर आहे. मला खूप भीती वाटत आहे. कृपा करुन माझ्यासाठी काहीतरी करा."

पहा व्हिडिओ:

गंगाने 'युवा डान्सिंग क्वीन' या रियालिटी शो चे सुत्रसंचालन केले होते. तसंच तिने शॉर्ट फ्लिममध्येही काम केले आहे. हळूहळू अभिनेत्री मधून ती आपली वाट चोखाळत आहे. गंगा ट्रान्सजेंडर असून तिचे पूर्वीचे नाव प्रणित हाटे असे होते. अनेक संघर्षानंतर तिने गंगा पर्यंतचा प्रवास केला आहे.