#MeToo फेम बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता लढवणार लोकसभा निवडणूक?
Tanushree Dutta (Photo credits: Twitter)

2018 मध्ये #MeToo चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेली बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) झारखंडच्या जमशेदपूर (Jamshedpur) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवू शकते. झारखंड पीपल्स पार्टीचे सूर्य सिंह यांची कन्या नितीशा बेसरा (Nitisha Besra) यांनी याबाबत माहिती दिली आहे. झारखंडमधील 14 लोकसभा जागांवर 14 वेगवेगळ्या संघटना निवडणुका लढविणार आहेत. यासाठी जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातून तनुश्रीला उमेदवारी देण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला आहे, तथापि तनुश्रीच्या वतीने अद्याप या प्रस्तावाबद्दल कोणतेही उत्तर आले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी झारखंडमध्ये सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यावेळी नितीशा बेसरा यांनी सांगितले की झारखंडमधील 14 लोक वेगवेगळ्या जनमतच्या बॅनरखाली सर्व लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहेत.

उलगुलान झारखंड पार्टी, होरो राष्ट्रीय सेंगेल पार्टी, तृणमूल काँग्रेस, एमसीसी, भाकपा, माकपा, सीपीएमएल, आम आदमी पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन समाज पक्ष असे 14 पक्ष भाजप सरकारला उलटून लावण्यासाठी प्रयत्न करतील. यामध्ये जमशेदपूरच्या जागेसाठी तनुश्री दत्ताशी बोलणे चालू आहे. तनुश्रीच्या वडिलांनी यासाठी हिरवा सिग्नल दिला आहे त्यामुळे, तनुश्री जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता बळकट होत आहे. (हेही वाचा: ‘रॉबर्ट वाड्रा यांचे सहर्ष स्वागत’ मतदारसंघात पोस्टर्स झळकले, राजकीय वर्तुळात खळबळ)

मागच्या वर्षी चाललेल्या #metoo चळवळीमुळे तनुश्रीचे नाव सर्वदूर झाले. 2009 साली 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल तनुश्रीने आवाज उठवला होता. यावेळी नाना पाटेकर यांचे नाव समोर आले होते. इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी तनुश्रीला पाठींबा दर्शवला होता, मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती.