तनुश्रीचे नाना पाटेकरांवर गंभीर आरोप; मुद्दाम जवळीक साधून नानांना करायचा होता इंटीमेट सीन
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर (Photo Credits: Youtube/Facebook)

सध्या जगात #metoo मोहीम चांगलीच गाजत आहे. या मोहिमेअंतर्गत कित्येक अभिनेत्रींनी त्यांच्याबाबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल वाचा फोडली. याद्वारे कित्येक निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांची नावे समोर आली ज्यामुळे बरीच खळबळ देखील माजली होती. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनीही याबाबतचे आपले अनुभव जगासमोर मांडले. राधिक आपटे तर या बद्दल नेहमीच बोलत आली आहे. आणि आता या यादीत एका नव्या अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे ती म्हणजे तनुश्री दत्ता.

असभ्य वर्तन, मुद्दाम जवळीक साधण्याचा प्रयत्न, मारहाणीचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर आरोप, तनुश्री दत्ताने एकूण 4 लोकांवर लावले आहेत. या चारही व्यक्ती बॉलिवूडमधील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्यापैकी एक नाव आहे नाना पाटेकर यांचे. नाना पाटेकर यांच्यासोबतच सामी सिद्दकी, राकेश सारंग, गणेश आचार्य हे त्या कृत्यात सामील होते असे तनुश्रीचे म्हणणे आहे.

झूम टीव्हीसाठी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या गैरवर्तवणूकीचा उल्लेख केला आहे. 2008 साली तनुश्री दत्ताला ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटामध्ये कास्ट करण्यात आले होते. सुरुवातीपासूनच नानांचे वागणे तनुश्रीसोबत ठीक नव्हते. चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी तनुश्रीशी अनेक वेळा असभ्य वर्तन केले. नानांनी तनुश्रीच्या हाताला पकडणे, तिला खेचणे असे प्रकार सुरु केले होते. याबाबत तनुश्रीने निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोघांकडेही तक्रार केली होती मात्र, दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर नानांनी एका गाण्यामध्ये तनुश्रीसोबत इंटीमेट सीन करण्याची मागणी केली. करारानुसार ते गाणे फक्त तनुश्रीवर चित्रित करण्यात येणार होते. मात्र तरीही नाना पाटेकर यांना त्या गाण्यामध्ये तनुश्रीसोबत डान्स करायचा होता.

यानंतर जेव्हा तनुश्रीने याबाबत आपला आवाज उठवला तेव्हा नाना पाटेकर यांनी सेटवर मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. ज्यांनी सेटवर बराच धिंगाणा घातला आणि तनुश्रीच्या गाडीची तोडफोड केली. शेवटी बंदुकधारी पोलिसांच्या मदतीने ही तोडफोड थांबवण्यात आली. 2008 साली चित्रपटाच्या शुटींगदरम्यान ही घटना घडली होती असे तनुश्रीने सांगितले. त्यांनतर तनुश्रीऐवजी राखी सावंतला घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्यात आला.

नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. बॉलिवूडमधील सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे,  मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असं तनुश्री ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. अक्षय कुमार, रजनीकांत यांसारख्या मोठ्या कलाकारांनी नानांसोबत काम करणं थांबवलं पाहिजे. जर मोठ्या कलाकरांनी महिलांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या अशा लोकांसोबत काम करणं सुरूच ठेवलं तर #metoo मोहिम कधीही यशस्वी होऊ शकत नाही असंही तनुश्री म्हणाली.

तनुश्री दत्ता हिने 2005 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘आशिक बनाया आपने’ सिनेमातून ती प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर ढोल, चॉकलेट, रिस्क आणि स्पीडसारखे चित्रपट तुनश्रीने केले आहेत. मात्र, गेल्या 8 वर्षांपासून तनुश्री बॉलिवूडपासून दूर आहे.